मुंबई :
जवळपास 26 वर्षाच्या सेवाकार्यानंतर सुरेश नारायणन हे नेस्ले इंडियामधून व्यवस्थापकीय संचालकपदावरून निवृत्त होत असून त्यांच्या जागी मनीष तिवारी यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. सुरेश नारायणन प्रत्यक्षात 2025 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत.
कंपनीच्या विकासामध्ये अनेक आव्हाने पेलून नारायणन यांनी आपले कार्य उत्तमपणे निभावले आहे. 2015 मध्ये त्यांनी व्यवस्थापकीय संचालकपदाची कंपनीत धुरा सांभाळण्यास सुरुवात केली होती. 31 जुलै 2025 पासून नारायणन हे प्रत्यक्षात पायउतार होणार आहेत. त्यांच्यानंतर आता अॅमेझॉन इंडियाचे नेतृत्व करणारे मनीष तिवारी यांची निवड करण्यात आली आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून ते व्यवस्थापकीय संचालकपदाची नव्याने धुरा सांभाळणार आहेत.
नारायणन यांची एंट्री
सुरेश नारायणन 2015 मध्ये नेस्ले इंडियाची जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने कंपनीला प्रगतीपथावर नेले. त्याच काळामध्ये मॅगी नूडल्सबाबत देशभरातून तक्रारीचा सूर उमटला होता. पण ही परिस्थिती त्यांनी लिलया पेलली व नेस्लेला पुन्हा एकदा विकासामध्ये पुढे आणले.
तिवारींचा परिचय
सध्याला नव्याने नियुक्त झालेले तिवारी यांना ई कॉमर्स आणि ग्राहकोपयोगी विभागाच्या कामाचा बऱ्यापैकी अनुभव आहे. 2016 पासून ते अॅमेझॉन इंडियामध्ये कार्यरत आहेत. यासोबत युनिलिव्हरमध्येसुद्धा त्यांनी कार्य केले होते.