सर्वोच्च न्यायालयाने फटकारताच राऊस एव्हेन्यू न्यायालयात याचिका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कथित मद्य धोरण घोटाळय़ात सीबीआयने अटक केलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शुक्रवारी न्यायालयात नियमित जामीन याचिका दाखल केली. सिसोदिया यांच्या वकिलाने राऊस एव्हेन्यू न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या याचिकेवर शनिवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी त्यांनी सीबीआयने केलेल्या अटकेला थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, सरन्यायाधीशांनी फटकारत त्यांना दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले होते. प्रकरण दिल्लीतील असले तरी तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात येऊ शकत नाही असे सांगत त्यांच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.
मनीष सिसोदिया यांना 26 फेब्रुवारीला आठ तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर सीबीआयने अटक केली होती. यानंतर त्यांना 27 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. सिसोदिया यांच्या सीबीआय चौकशीत घोटाळय़ाशी संबंधित धागेदोरे सापडल्यास त्यांची कोठडी वाढवून देण्याची मागणी तपास पथकाकडून न्यायालयात केली जाऊ शकते.









