पुढील सुनावणी 30 मे रोजी : अबकारी घोटाळ्यातील आरोपी
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अबकारी धोरण घोटाळ्यातील आरोपी असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 30 मेपर्यंत वाढ झाली आहे. राउज अॅव्हेन्यू न्यायालयात बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी सिसोदिया यांच्या विरोधातील सीबीआयच्या प्रकरणात 30 मे रोजी आरोप निश्चित केले जाणार असल्याचे सांगितले आहे.
सिसोदिया यांनी आरोपांवरील युक्तिवाद रोखण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. याचमुळे यावरील सुनावणी स्थगित करण्यात आली आहे. यापूर्वी राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी 15 मेपर्यंत वाढविली होती. तर ईडीकडुन दाखल गुन्ह्याप्रकरणी त्यांची कोठडी 21 मेपर्यंत आहे.
14 मे रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सिसोदिया यांच्याकडून दाखल जामीन याचिकेवर सुनावणी झाली. याप्रकरणी न्यायाधीश स्वर्णकांता शर्मा यांनी निर्णय राखून ठेवला आहे. सिसोदिया यांच्या वतीने वरिष्ठ वकील दयन कृष्णन आणि मोहित माथुर यांनी युक्तिवाद केले. तर ईडीच्या वतीने जोहेब हुसैन आणि सीबीआयच्या वतीने एसपीपी रिपुदमन भारद्वाज कृष्णन यांनी बाजू मांडली आहे.
आम आदमी पक्षच आरोपी
8 मे रोजी उच्च न्यायालयाने ईडी आणि सीबीआयला सिसोदियांच्या जामीन अर्जावर स्वत:ची बाजू मांडण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली होती. सुनावणीत ईडीने सिसोदियांच्या जामिनाला विरोध दर्शवत आम आदमी पक्षालाच या प्रकरणी आरोपी केले जाणार असल्याचे सांगितले होते. पुढील आरोपपत्रात आम आदमी पक्षाचा आरोपी म्हणून उल्लेख असणार आहे.









