नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीचे माजी शिक्षणमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीश सिसोदिया यांचे नाव दिल्लीतील मद्यधोरण घोटाळय़ाच्या आरोपपत्रात प्रथमच समाविष्ट करण्यात आले आहे. हे आरोपपत्र सीबीआयने सादर केले आहे. दिल्लीच्या विशेष न्यायालयात सीबीआयकडून हे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे.
दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने दोन वर्षांपूर्वी राज्याच्या मद्यधोरणात मोठे परिवर्तन केले होते. त्यामुळे काही मद्यसम्राटांचा प्रचंड लाभ झाला, असा आरोप आहे. सिसोदिया हे त्यावेळी मद्यधोरण मंत्री होते. या प्रकरणी सीबीआयने चौकशी सुरु केली असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सिसोदियाही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या कथित घोटाळय़ाची पाळेमुळे दिल्लीबाहेर महाराष्ट्र आणि तेलंगणातही पोहचली आहेत, अशी चर्चा आहे. प्रारंभी या घोटाळय़ात सिसोदिया यांचे नाव नव्हते. तथापि, नंतर सीबीआयने त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांचा आरोपपत्रात आरोपी म्हणून समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या विरोधात पुरेसे पुरावे आहेत, असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. सीबीआयप्रमाणे ईडीहवी या प्रकरणात सक्रीय झाली आहे.









