मणिपूर येथील महिलांनी विवस्त्र करून धिंड काढल्याच्या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाजमाध्यमांसह राजकिय़ आणि सामाजिक क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली असून कारवाईची मागणी केली आहे. यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्येक ठिकाणी सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करणार असेल तर न्यायालयानेच देश चालवावा असा सल्ला दिला आहे. भातखळकरांच्या या ट्विटमुळे त्यांनी अनेक टिकांना तोंड द्यावे लागत असून सोशलमीडीयावर भातखळकरांना ट्रोल केले जात आहे.
दोन दिवसापुर्वी मणिपूरमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याचे राजकिय पडसादही उमटत आहेत. या व्हिडीओनंतर देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संबंधी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देऊन लवकरात लवकर कारवाई न झाल्यास सर्वोच्च न्यायालयाला कारवाई करावी लागेल असा इशारा दिला आहे. ते म्हणाले,“अशा हिंसाचाराविरोधात गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांची माहिती न्यायालयाला दिली पाहिजे. माध्यमांमधील व्हिडीओंमध्ये जे दिसत आहे ते घटनाविरोधी आहे. महिलांचा हिंसाचारासाठी साधन म्हणून वापर करणे आणि मानवी जीवनाचा भंग करणे घटनात्मक लोकशाहीच्या विरोधात आहे”, असं मत धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केलं होतं.
पुढे बोलताना त्यांनी “आम्ही सरकारला कारवाई करण्यासाठी थोडा वेळ देऊ, सरकारने कोणतेही कारवाई केली नाही तर आम्हीच पावले उचलू….तो व्हिडीओ पाहून आम्ही व्यथित झालो आहोत…या प्रकाराबाबत आम्ही चिंता व्यक्त करत आहोत…सरकारने पुढे येऊन पावलं उचलली पाहिजेत आणि कारवाई केली पाहिजे.” असेही ते म्हणाले.
सरन्यायाधीशांच्या या प्रतिक्रियेनंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “सरकारचे काम सर्वोच्च न्यायालय करणार असेल, तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा…कशाला हव्यात निवडणुका आणि संसद? खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची ऑर्डर पास केली की देश कसा सुरळीत चालेल?” असा प्रश्नही त्यांनी विचारला. दरम्यान, भातखळकरांच्या या विधानावरून त्यांना टिकेला तोंड द्यावे लागत असून सोशलमीडीयावर त्यांना ट्रोल केले जात आहे.