वृत्तसंस्था / इंफाळ
कोणत्याही परिस्थितीत मणिपूरचे विभाजन होऊ दिले जाणार नाही, असा निर्धार त्या राज्याचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी व्यक्त केला आहे. जे समाज किंवा व्यक्ती बेकायदा शस्त्रे बाळगत आहेत, त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. मी केंद्रीय गृहमंत्रंाr अमित शहा यांना भेटलो असून त्यांना राज्यातील परिस्थितीविषयी सविस्तर माहिती दिली आहे. राज्यात झालेल्या दंगलींसंबंधी शहा यांनी दु:ख व्यक्त केले. मात्र, मणिपूरच्या एकात्मतेविषयी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. काही दिवसांपूर्वी राज्यातील मैतेयी समाज आणि कुकी समाज यांच्यात सशस्त्र संघर्ष झाला होता. त्यात 54 व्यक्तींचा मृत्यू झाला होता, तर मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेची हानी झाली होती.









