जमाव-जवानांमध्ये गोळीबार : उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक
वृत्तसंस्था /इंफाळ
हिंसाचाराच्या घटनांमुळे मणिपूर अद्यापही अशांतच आहे. गुऊवारी सकाळी इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील उत्तर बोलझांग येथे जमाव आणि सैन्यामध्ये गोळीबार झाला. मणिपूरमधील परिस्थिती गंभीर बनत चालल्याने गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवार, 24 जून रोजी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. काँग्रेसने ही बैठक खूप उशिरा होत असल्याचे म्हटले आहे. दिल्लीत बसून मणिपूरच्या जनतेशी चर्चा करण्याचा प्रयत्न झाला तर त्याचे गांभीर्य दाखवले जाणार नाही, असे सांगत मणिपूरमध्येच बैठक घेण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे. मणिपूरमध्ये 3 मे रोजी सुरू झालेल्या हिंसाचाराला 50 दिवस पूर्ण झाले आहेत. पण तिथली परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतच चालली आहे. गोळीबार किंवा बॉम्बस्फोटाच्या घटना रोजच घडत आहेत. बुधवारी रात्री बिष्णुपूरमध्ये कार स्फोटात तीन जण जखमी झाले, तर बुधवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास इंफाळ पूर्व जिह्यात स्वयंचलित लहान शस्त्रांनी गोळीबार करण्यात आला. त्यानंतर गुरुवारी सकाळीही जमावाकडून पुन्हा गोळीबार झाला. जवानांनी जमावाला पांगवल्यामुळे कोणतीही मोठी हिंसक घटना घडलेली नाही. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी बुधवारी एक व्हिडिओ संदेश जारी करून मणिपूरच्या लोकांना शांतता आणि सद्भाव राखण्याचे आवाहन केले होते. या हिंसाचाराने आपल्या देशाच्या विवेकबुद्धीवर खोल घाव टाकला आहे. या हिंसाचारामुळे मणिपूरमधील लोकांचे जीवन उद्ध्वस्त होत असून हजारो लोक निराधार झाल्याचे त्यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटले होते.









