भूतकाळ विसरत नवी सुरुवात करावी लागणार : अवैध स्थलांतरितांची समस्या मोठी
वृत्तसंस्था/ इंफाळ
3 मे 2023 पासून होत असलेल्या हिंसेसाठी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. विरेन सिंह यांनी राज्याच्या लोकांची माफी मागितली आहे. भविष्यात शांतता आणि सौहार्दासाठी प्रयत्न करत नववर्षात जे घडून गेले आहे ते विसरत नवी सुरुवात करावी लागेल असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी सर्व समुदायांना केले आहे. हिंसेत अनेकांनी स्वकीयांना गमाविले असून अनेकांना स्वत:चे घर सोडावे लागले आहे. याप्रकरणी मी सर्वांची माफी मागू इच्छितो असे त्यांनी म्हटले आहे. राजधानी इंफाळमधील स्वत:च्या निवासस्थानी सरकारची विकासकामे आणि कामगिरी तसेच आगामी वर्षासाठीच्या योजनांवर बोलताना सिंह यांनी ही टिप्पणी केली आहे.
हवाईप्रवासासाठी महाग तिकीटाची समस्या संपविण्यासाठी मणिपूर सरकार किफायतशीर दरात हवाईप्रवास सेवा सुरू करणार आहे. याच्या अंतर्गत विमानप्रवासाचे भाडे 5 हजार रुपयांपेक्षा अधिक नसेल. मणिपूर सरकार हवाईप्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीटासाठी अनुदान प्रदान करणार आहे. हवाईसेवा इंफाळ-गुवाहाटी, इंफाळ-कोलकाता आणि इंफाळ-दीमापूर मार्गावर आठवड्यात दोनवेळा संचालित होणार असल्याची घोषणा विरेन सिंह यांनी केली आहे.
मणिपूर अंतर्गत अणि बर्हिगत दोन्ही प्रकारच्या अवैध स्थलांतरितांच्या मुद्द्याला सामोरा जात आहे. सरकार आवश्यक इनर लाइन परमिटशिवाय राज्यात प्रवेश करणाऱ्या घुसखोरांची ओळख पटविण्यासाठी प्रयत्नशील आहे. अवैध स्थलांतरितांसंबंधी बायोमेट्रिक नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. अवैध स्थलांतरितांची समस्या समाप्त करण्यासाठी आधार-लिंक्ड बर्थ रजिस्ट्रेशन जानेवारीत सुरू केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ही व्यवस्था तीन जिल्ह्यांमध्ये लागू होणार आहे. जन्मनेंदणी अनिवार्य करण्यात येईल आणि दर 5 वर्षांनी अपडेट करावे लागणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
2058 विस्थापित घरी परतले
ही व्यवस्था मणिपूरच्या काही जिल्ह्यांमध्ये मतदारयादीत मतदारांच्या संख्येत 420 टक्क्यांची वाढ दिसून आल्यावर लागू करण्यात आली आहे. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नाच्या अंतर्गत एकूण 2058 विस्थापित परिवारांना त्यांच्या मूळ घरांमध्ये पुनर्स्थापित करण्यात आले आहे. यात इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, कांगपोकपी आणि चुराचांदपूरचे क्षेत्र सामील आहे. याचबरोबर मणिपूरच्या राष्ट्रीय महामार्गांवरील हिंसा रोखण्यासाठी सरकारने अनुक्रमे एनएच-2 (इंफाळ-दीमापूर) आणि एनएच-37 (इंफाळ-सिलचर)वर जवानांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात केल्या आहेत. भारतीय सैन्य, सीआरपीएफ, बीएसएफ आणि राज्य पोलिसांचे जवानही राष्ट्रीय महमार्गांवर सुरक्षेकरता तैनात असल्याचे विरेन सिंह यांनी सांगितले आहे.
चर्चेसाठी केंद्र सरकारचा पुढाकार
मणिपूरमध्ये शांतता बहाल केली जात आहे. याकरता एकमात्र उपाय चर्चा अन् संवाद असून त्याकरता केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. राज्याच्या शस्त्रागारातून लुटण्यात आलेली 6 हजार शस्त्रs, दारूगोळा आणि विस्फोटकांपैकी 3 हजाराहून अधिक शस्त्रs हस्तगत करण्यात आली आहेत. 625 आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण 12,247 एफआयआर नोंद झाले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.









