मंत्रिमंडळाची राज्यपालांना शिफारस
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये सुरू असलेली हिंसा आणि विरोधकांची राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीदरम्यान राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल अनसुईया उइके यांना विधानसभेचे अधिवेशन 21 ऑगस्टपासून सुरू करण्याची शिफारस केली आहे. अनेक नागरी समाज संघटनांकडून राज्यात सुरू असलेल्या संकटावर चर्चेसाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याची मागणी करण्यात आली होती.
तर मणिपूरमधील हिंसेवरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ दिसून येत आहे. मणिपूर हिंसेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत वक्तव्य करावे अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. तर मणिपूर संबंधी चर्चा करण्यास तयार असल्याचे सरकारकडून अनेकदा सांगण्यात आले आहे.
विरोधी पक्षांची आघाडी इंडियाच्या शिष्टमंडळाने अलिकडेच मणिपूरचा दौरा करत पीडितांची भेट घेतली आहे. तसेच राज्यपाल उइके यांची भेट घेत स्वत:चे म्हणणे त्यांच्यासमोर मांडले आहे. यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विनंती केली आहे.
मणिपूरमधील तणाव मोठ्या प्रमाणात कमी झाला असला तरीही काही हिंसक घटना घडत आहेत. मैतेई आणि कुकी समुदायादरम्यान 3 मे रोजी झालेल्या हिंसेनंतर राज्यातील स्थिती बिघडली आहे. मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात कुकी समुदायाने निदर्शने केली होती. या निदर्शनांनी हिंसेचे रुप धारण केले आहे. या हिंसेत आतापर्यंत 150 लोकांना जीव गमवावा लागला आहे.









