वृत्तसंस्था/ बुसान (कोरिया)
येथे सुरू असलेल्या विश्व टेबल टेनिस महिलांच्या सांघिक चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघाने विजयी सलामी देताना रविवारी झालेल्या लढतीत हंगेरीचा 3-2 अशा फरकाने पराभव केला. या लढतीमध्ये भारताच्या मनिका बात्राने एकेरीचे आपले दोन्ही सामने जिंकले. मात्र पुरूषांच्या विभागात भारताला पोलंडकडून हार पत्करावी लागली.
भारत आणि हंगेरी यांच्यातील सलामीच्या लढतीत पहिल्या एकेरी सामन्यात भारताच्या मनिका बात्राने हंगेरीच्या डोरा मॅडेरेसचा 8-11, 11-5, 12-10, 8-11, 11-4 असा पराभव केला. त्यानंतर या लढतीमध्ये दुसऱ्या एकेरी सामन्यात जॉर्जिना पोटाने एकेरीचा सामना जिंकून हंगेरीला बरोबरी साधून दिली. या सामन्यात हंगेरीच्या पोटाने भारताच्या श्रीजा अकुलाचा 3-11, 7-11, 11-9, 11-9, 11-8 असा पराभव केला. त्यानंतरच्या एकेरीच्या सामन्यात भारताच्या अहिका मुखर्जीने हंगेरीच्या सन इंगहेसवर 7-11, 11-6, 11-7, 11-8 अशी मात करत आपल्या संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतरच्या निर्णायक एकेरी सामन्यात मनिका बात्राने पोटाचा 11-5, 14-12, 13-11 असा पराभव केल्याने भारताने ही लढत 3-2 अशा फरकाने जिंकली. आता या स्पर्धेत भारतीय महिला संघाचे पुढील सामने स्पेन आणि उझबेकिस्तान यांच्या बरोबर होणार आहेत. या गटात चीनचा संघ 3 लढती जिंकून आघाडीवर आहे.
पुरूषांच्या विभागात पोलंडने भारताचा 3-1 असा एकतर्फी पराभव केला. भारतातर्फे हरमित देसाईने आपला एकमेव एकेरीचा सामना जिंकताना पोलंडच्या मॅसि क्यूबिकचा 12-10, 13-11, 9-11, 11-5 असा पराभव केला. भारताच्या शरद कमल आणि मानव ठक्कर यांना मात्र आपले एकेरीचे सामने गमवावे लागले. हरमित देसाईने एकेरीच्या सामन्यात पोलंडच्या जेकुब दियासचा 7-11, 7-11, 11-8, 12-14 असा पराभव केला.









