ऑनलाईन टीम/तरुण भारत
त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या एक वर्ष आधी, बिप्लब कुमार देब यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर, शनिवारी माणिक साहा यांची त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. त्रिपुरा विधानसभा निवडणुका २०२३ मध्ये होणार असून डॉ. साहा हेच या निवडणुकीत पक्षाचा चेहरा असेल, असे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले.
माणिक साहा हे रविवारी आगरतळा येथील राजभवनात त्रिपुराचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा सकाळी ११. ३० वाजता होणार आहे. त्रिपुरा विधानसभा निवडणुका २०२३ मध्ये होणार असून डॉ. साहा हेच या निवडणुकीत पक्षाचा चेहरा असेल, असे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले.
साहा हे सध्या त्रिपुराचे राज्यसभा खासदार आहेत आणि राज्याच्या भारतीय जनता पार्टी (भाजप) युनिटचे अध्यक्ष आहेत.साहा यांनी २०१६ मध्ये काँग्रेस सोडल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. २०२० मध्ये त्यांना भाजप पक्षाच्या राज्य युनिटचे अध्यक्ष बनवण्यात आले आणि या वर्षी मार्चमध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली.
साहा यांचे मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर भाजपने शनिवारी काही नव्या चेहऱ्यांसह पक्षाच्या त्रिपुरा समितीची पुनर्रचना केली. या समितीत आता सात उपाध्यक्ष, तीन सरचिटणीस, सहा सचिव आणि सात प्रवक्ते यांचा समावेश असेल, असे सांगण्यात आले.