मुळे बांधकामात घुसत असल्याने अनेक ठिकाणी तडे, पायाही कमकुवत
पणजी : राजधानी पणजी शहर आणि रायबंदरला जोडणाऱ्या सुमारे 400 वर्षे जुन्या पुलाच्या शाश्वतेबाबत पुन्हा एकदा शंका उपस्थित करण्यात येऊ लागली आहे. अलीकडच्या काळात या पुलाच्या संरक्षक भिंतीना अनेक ठिकाणी तडे गेले असून त्यामुळे सदर पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असल्याचे समोर आले आहे. एका बाजूने अथांग मांडवी नदी आणि दुसऱ्या बाजूने अफाट पसरलेली मिठागरे यांच्या मध्ये असलेला हा सुमारे 3.2 किमी लांबीचा पूल म्हणजे बांधकामाचा एक अजब नमूना आहे. 1634 मध्ये केवळ दीड वर्षाच्या कालावधीत बांधण्यात आलेल्या या पुलाला त्याकाळी जगातील सर्वात लांब पूल अशी ख्याती प्राप्त झाली होती. अंदाजे 80 खांबांवर (कमानी) उभारण्यात आलेल्या या पुलाला ’पोंटे डी लिन्हारेस’ म्हणून ओळखण्यात येत होते.
मात्र नंतरच्या काळात मांडवीतील गाळ वाढत जाऊन सर्व खांब बुजले गेले व आज त्याची स्थिती एखादा बांध भासावा अशी झालेली आहे. सर्व खांबांच्यामध्ये गाळ साचल्यामुळे पाण्याच्या जवळजवळ वाटा बंद झाल्या असून केवळ एकच वाट शिल्लक राहिली आहे. त्यामुळे नदीच्या लाटांचे तडाखे सहन करत सदर पूल तग धरून उभा आहेत. या पुलाचे बांधकाम करण्यात आले तेव्हा केवळ बैलगाडी किंवा टांगा हेच प्रवासाचे साधन होते. नंतरच्या काळात ‘कार्रेर’ नामक वाहनांची ये-जा होऊ लागली. मात्र ते प्रमाण सुद्धा अत्यंत अल्प होते. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर हळुहळू वाहनांची संख्या वाढत गेली व रोज शेकडोच्या संख्येन वाहनांची वाहतूक होऊ लागली.
‘रक्षक’ खारफुटी ठरतेय ‘भक्षक’
दरम्यान, 1980 च्या दशकात मातीची मोठ्या प्रमाणात धूप होत असल्याने वनखात्याने या पुलाच्या मांडवी काठावर मोठ्या प्रमाणात खारफुटीची झाडांची लागवड केली. मातीची धूप रोखून पुलाचे संरक्षण करणे हा त्यामागे हेतू होता. परंतु ते प्रयत्न आता अंगलट आले असून रक्षक न बनता ती खारफुटी भक्षक बनू लागली आहे. खारफुटीची मुळे पुलाच्या खांबांमध्ये घुसत असून त्यामुळे अनेक ठिकाणी तडेही गेल्याचे पाहणीत दिसून आले आहे. हा प्रकार बांधकाम खात्याच्या लक्षात आल्यानंतर पुढील नुकसानी टाळण्यासाठी खात्याने संरक्षकभिंत बांधण्याचे काम हाती घेतले होते. तसेच पुलावरील वाहनांचा भार हलका करण्यासाठी अवजड वाहने पर्यायी मार्गाने वळवली होती. त्याशिवाय पुलाला कंपने बसू नयेत यासाठी वाहनांच्या वेगावरही बंधने घालण्यात आली होती.
‘साबांखा’कडून वरकरणी मलमपट्टी
परंतु एवढ्या सर्व उपाययोजना आखूनही त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचे ताज्या निरीक्षणात दिसून आले आहे. खारफुटीची मुळे अधिकच अडथळा ठरू लागली असून काही ठराविक ठिकाणी तर दाट खारफुटीने पूल पूर्णपणे व्यापला आहे. त्यातून पुलाचा पाया कमकुवत बनत असून अनेक ठिकाणी रस्त्याला उभे तडे जाऊन तो खचूही लागला आहे. ‘साबांखा’कडून वरकरणी मलमपट्टी करून तो स्थिरस्थावर करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
पूल आजही सुरक्षित : काब्राल
दरम्यान, एकूण अशी वस्तुस्थिती असतानाही साबांखा मंत्री नीलेश काब्राल यांनी मात्र सदर पूल आजही सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. पुलाच्या सुरक्षेबाबत कोणतीही भीती बाळगण्याची किंवा चिंता करण्याची गरज नसल्याचा दिलासाही त्यांनी दिला आहे. पुलाचा संरचनात्मक आढावा घेण्याचे निर्देश खात्याला देण्यात आले असून स्थिरतेबाबत कोणतीही शंका आल्यास व्यावसायिक तसेच प्रवासी वाहनांसाठी पूल बंद करण्यात येईल, असे काब्राल यांनी सांगितले आहे.









