सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी गवळी तिठा येथील मातृछाया मंगल कार्यालय येथील आबा कशाळीकर यांच्या मालकीचे भले मोठे आंब्याचे झाड जुन्या मुंबई गोवा हायवेवर पडले. सुदैवाने कोणालाही काही झाले नाही. सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही घटना घडली . गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे हे भले मोठे झाड उन्मळून पडले आहे . जुन्या मुंबई गोवा हायवेवर मातृछाया मंगल कार्यालयालगतच हे आंब्याचे झाड होते. आंब्याचे झाड उन्हाळून पडले तेव्हा सुदैवाने कोणतीही वाहने अथवा या मार्गाने कोणी जात नव्हते. या मार्गावर नेहमी सावंतवाडी -कुडाळ- माणगाव येजा करणाऱ्यांची संख्या अधिक असते . मात्र यावेळी वाहनांची संख्या तुरळक होती. जर, या मार्गावर एखादी एसटी बस अथवा कुठले वाहन या मार्गावरून जात असते आणि तेव्हा हे झाड पडले असते तर मोठा अनर्थ घडला असता . माजी नगराध्यक्ष बबन सागावकर यांनी नगरपालिकेला याबाबत कल्पना दिली त्यानंतर नगरपालिकेचे कर्मचारी ,आरोग्य अधिकारी पांडुरंग नाटेकर, दिलीप म्हापसेकर आदींनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करण्यासाठी युद्ध पातळीवर काम हाती घेतले होते.









