अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ, काही ठिकणी वाहतूक कोंडी
प्रतिनिधी / पणजी
पणजीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या देवी महालक्ष्मी मंदिराच्या लगतच कोकणी कॅन्टींगच्या बाजूला असलेला जुनाट आम्रवृक्ष काल गुऊवारी दुपारी अडीचच्या दरम्यान कोसळण्याची घटना घडली.
गेले दोन दिवस पणजीत जोरदार पाऊस कोसळत असून, गुऊवारी काही ठिकाणी किरकोळ पडझड झाली. पण, दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यानंतर आम्रवृक्ष रस्त्यावरच कोसळला. हे झाड जुनाट व खूप मोठे असल्याने संपूर्ण रस्ताच काही काळ वाहतुकीसाठी बंद पडला होता. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत झाट हटविण्याची मोहीम हाती घेतली. अथक परीश्रमानंतर हे झाड संध्याकाळी उशिरा बाजूला करण्यात आले.
झाड कोसळल्यानंतर बाजूला पार्क करून ठेवलेल्या एका दुचाकीसह चार चाकी वाहनावर झाडाच्या फांद्या गेल्या होत्या. त्यामुळे ही वाहने झाडाखालीच अडकून होती. यामध्ये या वाहनांचे किरकोळ नुकसान झाल्याचे समजते. दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धावून घेऊन झाड बाजूला केल्याने परिसरातील लोकांनी त्यांचे कौतुक केले.
जोरदार पावसामुळे वाहतूक कोंडी
गेले दोन दिवस राज्यासह पणजीत जोरदार पाऊस पडत आहे. पणजीतील अनेक रस्ते खड्डेमय झाल्याने वाट काढताना नागरिकांची व वाहनचालकांची दमछाक होत आहे. दिवसभर कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे दिवजा सर्कल, क्रांती सर्कल, मार्केट परिसर, 18 जून रस्ता आदी ठिकाणी काही काळ वाहतूक कोंडी झाली. गेल्या 24 तासांत पणजीत सुमारे 75.8 मि. मी. पाऊस पडल्याचे गोवा वेधशाळेने सांगितले.









