बेळगाव : आंबाप्रेमींसाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणारा आंबा महोत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आंबाप्रेमींतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. आंबा उत्पादनात झालेली घट आणि शासनाच्या अनुदानाचा अभाव यामुळे आंबा महोत्सव रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती बागायत खात्याने दिली. बागायत खात्याकडून दरवर्षी क्लब रोड येथील ह्यूम पार्कमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते. गतवर्षीच्या आंबा महोत्सवात तब्बल 130 टन आंब्यांची विक्री झाली होती. त्यामुळे आंबा विक्रेत्यांना याचा चांगला फायदा झाला होता. शिवाय ग्राहकांनाही एकाच छताखाली विविध आंब्यांची खरेदी करता आली होती. यंदा बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे म्हणावा तसा आंबा बाजारात दिसेनासा झाला आहे.
ग्राहकांना एकाच छताखाली आंब्यांची खरेदी करता यावी आणि विक्रेत्यांना विक्रीचे व्यासपीठ निर्माण व्हावे, यासाठी बागायत खात्यामार्फत आंबा महोत्सव भरविला जातो. मात्र, यंदा बेंगळूर मँगो बोर्डकडून अनुदान उपलब्ध झाले नाही. त्यामुळे यंदा आंबा महोत्सवाला मुकावे लागणार आहे. कोरोना काळात दोन वर्षे आंबा महोत्सव रद्द झाला होता. त्यानंतर गतवर्षी आंबा महोत्सवाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे यंदा आंबाप्रेमी आंबा महोत्सवाच्या प्रतीक्षेत होते. निवडणुकीनंतर आंबा महोत्सव भरविला जाईल, अशी आशा वाटत होती. मात्र अनुदानाअभावी यंदा आंबा महोत्सव होणार नसल्याची माहिती खात्याने दिली आहे. त्यामुळे आंबाप्रेमी, आंबा विक्रेते व ग्राहकांतून नाराजी व्यक्त होत आहे. या आंबा महोत्सवातून ग्राहकांना विविध जातींचे आंबे योग्य दरात खरेदी करता येतात. त्यामुळे शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांची गर्दी होते. केवळ चार दिवसांच्या आंबा महोत्सवात शेकडो टन आंब्यांची विक्री होते. त्यामुळे ग्राहक आणि विक्रेते आंबा महोत्सवाच्या प्रतीक्षेत असतात. अखेर आंबा महोत्सव भरला जाणार नसल्याची माहिती खात्याने दिली आहे. त्यामुळे विक्रेत्यांना मोठा फटका बसला आहे.









