हापूसचे आकर्षण : मध उत्पादनाचे प्रदर्शन : आंबाप्रेमींची वर्दळ
प्रतिनिधी/ बेळगाव
आंबाप्रेमींना उत्सुकता असलेल्या आंबा महोत्सवाला शनिवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. बागायत खात्याच्या क्लब रोड येथील ह्यूम पार्कमध्ये हा महोत्सव तीन दिवस चालणार आहे. आमदार राजू सेठ यांच्या हस्ते फीत कापून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
या महोत्सवात 25 हून अधिक विविध जातींचे आंबे उपलब्ध होणार आहेत. त्याबरोबरच कोकणातील हापूस आकर्षण ठरणार आहे. यंदा आंबा महोत्सवाबरोबर नैसर्गिक मध उत्पादनाचे प्रदर्शन आणि विक्रीही केली जात आहे. शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत आंब्यांची विक्री करता यावी, यासाठी बागायत खात्याने हा महोत्सव भरविला आहे. या महोत्सवात हापूस, केसर, तोतापुरी, मानकूर यासह इतर आंब्यांची चव चाखता येणार आहे.
या महोत्सवात तळकोकणातील देवगड, रत्नागिरी, मालवण येथील आंब्यांबरोबर कर्नाटकातील आंबे दाखल झाले आहेत. गतवर्षी या महोत्सवातून 100 टन आंब्यांची विक्री झाली होती. यंदा यापेक्षा अधिक विक्री होईल, अशी अपेक्षाही बागायत खात्याला आहे.
नैसर्गिक मधाचेही आकर्षण
या महोत्सवात नैसर्गिक मध उत्पादन, प्रदर्शन आणि विक्री मांडण्यात आली आहे. विशेषत: नैसर्गिकरीत्या तयार केलेला मध उपलब्ध करण्यात आला आहे. त्याबरोबरच विविध फळांची रोपटीही ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये आंबा, पेरू, जांभूळ, चिकू, कडीपत्ता, लिंबू आदींचा समावेश आहे. या महोत्सवाला आंबाप्रेमी नागरिकांची गर्दी होत आहे.









