विविध आंब्यांचे आकर्षण : नागरिकांमध्ये उत्सुकता, नैसर्गिक मध प्रदर्शन
बेळगाव : आंबाप्रेमींना उत्सुकता असलेल्या आंबा महोत्सवाला शनिवार दि. 26 पासून क्लब रोड येथील ह्युम पार्कमध्ये प्रारंभ होणार आहे. तीन दिवसीय महोत्सवात नागरिकांना एकाच छताखाली विविध जातीच्या आंब्यांची चव चाखता येणार आहे. त्याबरोबर यंदा प्रथमच मध उत्पादनाचे प्रदर्शन आणि विक्री होणार आहे. सकाळी 11 वा. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तर अध्यक्ष म्हणून आमदार आसीफ सेठ उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत फळांची विक्री करता यावी. यासाठी बागायत खात्याने हा आंबा महोत्सव भरविला आहे. यामध्ये हापूस, केशर, तोतापुरी, मानकूर यासह इतर जातीचे आंबे उपलब्ध होणार आहेत. त्याबरोबर नैसर्गिक दर्जेदार मधही ठेवला जाणार आहे. त्यामुळे आंबाप्रेमींमध्ये महोत्सवाबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या महोत्सवात देवगड, रत्नागिरी, मालवण येथील हापूस आंब्याबरोबर इतर 25 जातीचे आंबे एकाच ठिकाणी पहावयास मिळणार आहेत. विशेषत: नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. यंदा आंबा महोत्सवात नैसर्गिक मधही उपलब्ध होणार आहे. गतवर्षी आंबा महोत्सवातून 100 टन आंब्याची विक्री झाली होती. यंदा देखील अधिक प्रमाणात विक्री होईल, अशी आशा बागायत खात्याला आहे.









