बेळगाव : आंबाप्रेमींना उत्सुकता लागलेल्या यंदा आंबा महोत्सवाला शनिवार दि. 26 एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. त्याबरोबरच यंदा मध उत्पादनाचे प्रदर्शन आणि विक्रीही होणार आहे. क्लब रोड येथील ह्यूम पार्कमध्ये हा महोत्सव तीन दिवस चालणार आहे. त्यामुळे एकाच छताखाली विविध जातीच्या आंब्यांची चव चाखता येणार आहे. त्यामुळे आंबाप्रेमींमध्ये महोत्सवाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत आंबा आणि मधाची विक्री करता यावी यासाठी बागायत खात्यामार्फत हा महोत्सव भरविला जात आहे. विशेषत: शेतकऱ्यांकडून पिकविलेले हापूस, केशर, तोतापुरी, मानकूर यासह स्थानिक आंबेही उपलब्ध होणार आहेत. त्याबरोबरच नैसर्गिक दर्जेदार मधही उपलब्ध होणार आहे.
गतवर्षी या महोत्सवात 100 टन आंब्यांची विक्री झाली होती. त्यामुळे यंदादेखील अधिक आंबा विक्री होईल, अशी अपेक्षा आहे. विशेषत: या आंबा महोत्सवात तळ कोकणातील देवगड, रत्नागिरी, मालवण येथून हापूस आंबे येणार आहेत. विशेषत: नैसर्गिकरीत्या पिकविलेले आंबे ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. बेळगाववासियांना उत्सुकता असलेल्या आंबा महोत्सवात विविध जातींच्या आंब्यांबरोबर आता दर्जेदार मधही खरेदी करता येणार आहे. 26 एप्रिल रोजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी आमदार राजू सेठ राहणार आहेत. महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यावेळी उपस्थित राहणार आहेत. आंबाप्रेमींनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही बागायत खात्याने केले आहे.









