बदलत्या हवामानाचा परिणाम : दरात मात्र वाढ : आवक कमी असल्याने व्यापाऱयांसह आंबाप्रेमींमध्ये निराशा
प्रतिनिधी /बेळगाव
फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱया आंब्यांची आवक यंदा बाजारात म्हणावी तशी नाही. उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आवक मंदावल्याने दर मात्र आवाक्मयाबाहेर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना चव चाखणे कठीण झाले आहे.
दरवषी एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापासून प्रुट मार्केट आणि किरकोळ बाजारात आंब्यांची आवक अधिक प्रमाणात दिसून येत होती. मात्र, यंदा एप्रिल मध्य आला तरी आंब्यांची आवक म्हणावी तशी नाही. कोकणातील रत्नागिरी, देवगड, वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळ येथून आंब्यांची आवक अधिक प्रमाणात होते. मात्र, बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे आवक कमी झाली आहे. परिणामी बाजारात आंबा कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे. दर मात्र अधिक प्रमाणात आहेत. यंदा मार्चपासून आंब्यांची आवक कमी असलेली पाहायला मिळत आहे.
मागील दोन वर्षात कोरोनामुळे आंबा सिझन वाया गेला होता. दरम्यान, ऑनलाईन विक्रीसारखे पर्यायी मार्ग शोधावे लागले होते. मात्र याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता, त्यामुळे विक्रीदेखील कमी झाली होती. यंदा कोरोनाचा प्रकोप कमी झाला आहे. बाजारपेठा सुरळीत सुरू झाल्या आहेत. मात्र आंब्यांची आवक कमी असल्याने व्यापाऱयांसह आंबाप्रेमींची निराशा झाली आहे.
आंबे खवय्यांचा हिरमोड
दरवषी आंबा सिझनमध्ये बाजाराच्या चौकाचौकात विविध जातींचे आंबे पाहायला मिळत होते. मात्र, उत्पादनच कमी असल्याने घाऊक बाजारातही आंब्यांची आवक कमी आहे. सध्या प्रुट मार्केटमध्ये आंब्यांचा दर 1000 ते 1200 रुपये प्रति डझन आहे. त्यामुळे दर सर्वसामान्यांना न परवडणारा आहे. एप्रिल हंगामात बाजारात विविध जातींचे आंबे दाखल व्हायचे. त्यामुळे नागरिकांनाही खरेदी करणे सोयीस्कर व्हायचे. मात्र यंदा आवक कमी झाल्याने आंबे खवय्यांचा हिरमोड झाला आहे.









