रत्नागिरी :
मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे पुढील 3 ते चार दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. कोकणात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. गेले दोन दिवस वातावरण ढगाळ आहे. वादळी वातावरणाच्या प्रभावामुळे कोकणातील येथील आंबा–काजू बागायतदार चिंतातूर झाले आहेत. मंगळवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्याचा फटका खेड तालुक्यातील खोपीफाटा येथील पाच दुकानांना फटका बसला. तसेच एका गाळ्यावरील पत्रे उडून आलिशान कारचेही नुकसान झाले.
राज्याच्या अनेक भागात प्रचंड वाढलेले तापमान पाहता काही ठिकाणी 38 ते 37 तर 41 अंश सेल्सिअसच्या पलीकडे गेलं आहे. मात्र दुसरीकडे हवामान विभागाकडून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिह्यांना वादळी वाऱ्यासह गारपीट आणि जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे राज्यात उन्हाचा कडाका देखील वाढला आहे. गारपीट, पाऊस आणि वाढतं तापमान असं तिहेरी संकट सध्या राज्यावर आहे. कोकण पट्टीदेखील या वातावरणाच्या प्रभावाखाली आली आहे. अनेक भागात वादळी तर तुरळक पावसाच्या सरींचा गेल्या दोन दिवसांपासून शिडकावा होताना दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात गेले दोन दिवस पावसाच्या तुरळक सरी झाल्या.








