सत्ताधारी गटाची बाजी, हात उंचावून घेतले मतदान : महापौर-उपमहापौर यांचा सत्कार 9
प्रतिनिधी/ बेळगाव
सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत 23 वे नूतन महापौर म्हणून अखेर मंगेश पवार आणि उपमहापौर म्हणून वाणी जोशी यांनी बाजी मारली. शनिवारी महापालिकेच्या मुख्य सभागृहात हात उंचावून मतदान घेण्यात आल्यानंतर प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टण्णवर यांनी ही निवड जाहीर केली.
महापौरपदाचे उमेदवार मंगेश पवार यांच्या बाजूने 40 जणांनी हात उंचावून मतदान केले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी बसवराज मारुती मोदगेकर यांच्या बाजूने 20 जणांनी मतदान केले. तर पाच जण गैरहजर राहिले. त्यामुळे प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टण्णवर यांनी 20 मतांनी मंगेश पवार यांना विजयी घोषित केले. तर उपमहापौरपदाच्या उमेदवार वाणी जोशी यांच्या बाजूने 40 जणांनी हात वर करून मतदान केले. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार लक्ष्मी राघवेंद्र लोकरी यांच्या बाजूने 20 जणांनी मतदान केले. त्यामुळेप्रादेशिक आयुक्तांनी वाणी जोशी यांना विजयी घोषित केले. सकाळी 9 वाजल्यापासून महापौर-उपमहापौर निवडणुकीची प्रक्रिया महापालिकेच्या मुख्य सभागृहात सुरू झाली. अतिरिक्त प्रादेशिक आयुक्त एस. एस. बिरादार यांनी इच्छुकांकडून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली. सकाळी 11 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. त्यानंतर दुपारी 1 च्या दरम्यान प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टण्णवर सभागृहात हजर झाले. सुरुवातीला उपस्थित मतदारांची हजेरी घेण्यात आली. त्यानंतर सभागृहाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. 65 मतदारांपैकी 60 मतदार सभागृहात हजर होते. तर पाच जण गैरहजर होते. कोरम पूर्ण झाल्याने निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली.
महापौरपदासाठी मंगेश पवार, राजू भातकांडे, बसवराज मारुती मोदगेकर, शाहीदखान गौसखान पठाण यांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले होते. प्रादेशिक आयुक्तांनी प्रत्येकी एक अर्ज वैध ठरवला. ज्या कोणाला निवडणुकीतून माघार घ्यावयाची आहे त्यांनी अर्ज माघार घ्यावेत, असे सांगितले. त्यानंतर राजू भातकांडे, शाहीदखान पठाण यांनी निवडण़ुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्यानंतर प्रादेशिक आयुक्तांनी उमेदवार मंगेश पवार यांच्या बाजूने असणाऱ्यांनी हातवर करून मतदान करावे, असे आवाहन केल्यानंतर 40 जणांनी हात उंचावून मतदान केले. तर विरोधात केवळ शाहीदखान पठाण यांनी मतदान केले. तटस्थ भूमिका कोणीही घेतली नाही. त्यानंतर बसवराज मोदगेकर यांच्या बाजूने असणाऱ्यांनी हात वर करून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या बाजूने 20 जणांनी मतदान केले. तर 40 जणांनी विरोधात मतदान केले. तटस्थ भूमिका कोणीही घेतली नाही. मतदान केलेल्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. त्यावेळी प्रादेशिक आयुक्तांनी 20 मतांनी मंगेश पवार यांना विजयी घोषित केले.
उपमहापौरपदासाठी वाणी जोशी, खुर्शिदा दादापीर मुल्ला, दीपाली टोपगी, लक्ष्मी राघवेंद्र लोकरी यांनी अर्ज दाखल केले होते. सर्व अर्ज वैध ठरवून ज्या कोणाला अर्ज माघार घ्यावयाचा आहे त्यांनी माघार घ्यावेत, असे प्रादेशिक आयुक्तांनी आवाहन केल्यानंतर दीपाली टोपगी आणि खुर्शिदा मुल्ला यांनी माघार घेतली. वाणी जोशी आणि लक्ष्मी लोकरी उपमहापौरपदाच्या रिंगणात राहिल्या. त्यानंतर वाणी जोशी यांच्या बाजूने असणाऱ्यांना हात उंचावून मतदान करण्यास सांगितले. त्यावेळी 40 जणांनी मतदान केले. विरोधात 19 जणांनी तर पाच जण गैरहजर राहिले. लक्ष्मी लोकरी यांच्या बाजूने 20 जणांनी तर विरोधात 40 जणांनी मतदान केले. तर पाच जण गैरहजर राहिले. वाणी जोशी यांना 20 मतांनी विजयी घोषित केले.
नूतन महापौर-उपमहापौरांची निवड झाल्यानंतर त्यांचा प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टण्णवर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर महानगरपालिकेच्यावतीने मनपा आयुक्त शुभा बी. यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. उपस्थितांनी देखील नूतन महापौर-उपमहापौरांचे अभिनंदन केले.
पाच मतदार गैरहजर
23 व्या महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली. मात्र सभागृहात 65 पैकी 60 मतदार उपस्थित होते. मुख्य प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर सभागृहाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. त्यामुळे उपस्थित 60 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार प्रियांका जारकीहोळी, आमदार राजू सेठ आणि नगरसेवक अझिम पटवेगार गैरहजर राहिल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.









