मोटारसायकलवरून भामटे पसार : अडीच लाखांचा फटका
बेळगाव : चोऱ्या, घरफोड्यांपाठोपाठ चेनस्नॅचिंगच्या घटनाही वाढल्या आहेत. मंगळवारी रात्री पायी चालत आपल्या घरी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र भामट्यांनी पळवले आहे. शहापूर पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या लक्ष्मी रोड, शहापूर येथे ही घटना घडली आहे. मंजुळा मंजुनाथ सेठ (वय 35) रा. लक्ष्मी रोड यांनी मंगळवारी रात्री शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यांच्या पाठीमागून पायी चालत आलेल्या एका भामट्याने सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे 35 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र पळविले आहे. मंजुळा यांच्या घराजवळच ही घटना घडली आहे. मंजुळा यांच्या घरी मंगलकार्य असल्यामुळे खरेदीसाठी त्या आपल्या कुटुंबीयांसमवेत बाजारपेठेत गेल्या होत्या.
नंतर रात्री ऑटोरिक्षातून खडेबाजार शहापूर येथे पोहोचल्या. मंगळवारी खडेबाजार येथील श्री बसवण्णा देवाची जत्रा होती. इंगळ्यांचा कार्यक्रम होता. रात्री देवदर्शन घेऊन आपल्या घराकडे पायी चालत जाताना ही घटना घडली आहे. मंजुळा यांच्या पुढे त्यांची बहीण व मुलगी होती. थोड्या अंतरावर पाठीमागे मंजुळा होत्या. त्यांच्यासोबत चालत आलेल्या एका भामट्याने त्यांच्या खांद्यावर हात टाकला. त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र भामट्याने काढून घेतले. जवळच त्याचा साथीदार मोटारसायकल सुरू ठेवून होता. त्या मोटारसायकलवरून बसून दोघेही तेथून पसार झाले. घटनेची माहिती समजताच शहापूरचे पोलीस निरीक्षक सिद्धाप्पा सीमानी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर मंजुळा यांनी आरडाओरड केली तरी लोक जमा होण्याआधीच भामटे तेथून पसार झाले होते. शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.









