शहर परिसरात मंगलमय वातावरण : अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेचा वाढला उत्साह
बेळगाव : अयोध्या येथे आज श्रीराम मंदिरात श्रीरामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापना होणार असल्याने बेळगाववासियांमध्ये अपार उत्साह संचारला आहे. अवघे शहर राममय झाले आहे. गेल्या आठवड्यापासून विविध भागातील कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील मंदिरांची स्वच्छता केली आहे. याशिवाय संपूर्ण शहर विद्युत रोषणाईने उजळवले आहे. शहरातील मोठ्या वसाहती, अपार्टमेंट्सबरोबरच गल्लीबोळांमध्ये सुद्धा रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याची तयारी सुरू आहे. घराघरांवर श्रीराम नावाच्या अक्षराचे भगवेध्वज फडकत आहेत. मंगलमय अशा दीपावली सणाप्रमाणे सर्वत्र आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. सारे जनमन राममय झाले आहे. बहुसंख्य नागरिकांनी आपल्या घरावर विद्युत रोषणाई केली आहे तर हौशी सामाजिक कार्यकर्त्यांनी संपूर्ण गल्लीमध्ये विद्युत रोषणाई करून परिसर उजळला आहे. शहरातील सर्वच मंदिरांमध्ये आणि प्रामुख्याने राम मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांना पहाटेपासूनच प्रारंभ होणार आहे, तर अनेक मंदिरांमध्ये सामूहिक रामरक्षा पठण होणार आहे.
घरोघरी दीपोत्सव
सर्व मंदिरांमध्ये आणि घरोघरी ही दीपोत्सव साजरा होणार आहे. शिवप्रतिष्ठानतर्फे सायंकाळी सामूहिक दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधून विव्रेत्यांनी ध्वज पताका यांची विक्री सुरू केली आहे. यानिमित्ताने या साहित्याची चांगलीच विक्री झाल्याने व्यापारीवर्गातून मधून समाधान व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे बीएससी टेक्स्टाईल मॉल्सह बहुसंख्य वस्त्रप्रावरणाच्या दुकानांमध्ये केशरी व पिवळ्या रंगाच्या पोशाखांचे विशेष दालन सुरू झाले आहे. दुकानाच्या प्रवेशद्वारावरच पोशाखातील प्रतिमा उभारल्याने ते लक्षवेधी ठरत आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने फ्लेक्स व कटआऊट्स करणारे, विद्युत रोषणाई करणारे, पताका लावणारे, यांच्या हाताला काम मिळाले आहे. युवक मंडळे स्वत:ही ही कामे करत आहेत. तरुण कार्यकर्त्यांमध्ये अपूर्व उत्साह असून अनेकांच्या डीपीवर श्रीरामाच्या प्रतिमा आहेत, तर फोनच्या हॅलो ट्यून्स सुद्धा श्रीरामांच्या गीतांनीच वाजत आहेत.
बहुसंख्य ठिकाणी महाप्रसाद
शहर, उपनगर परिसरात बहुसंख्य ठिकाणी महाप्रसाद होणार असून उत्साही वातावरण पाहता महाप्रसादाला सुद्धा अलोट गर्दी होणार अशी सुचिन्हे दिसत आहेत. त्यामुळे रविवारी रात्रीपासूनच महिला आणि पुरुष कार्यकर्ते महाप्रसादाच्या तयारीला लागले आहेत. महिलांना भाजीसह आवश्यक बाजार आणून देण्यामध्ये तरुण कार्यकर्त्यांचा पुढाकार दिसून आला. गल्लीतील ज्येष्ठ महिलांच्या अनुभवी नेतृत्वाखाली महाप्रसादाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.









