पाच दिवसीय गणेशमूर्तींचे उत्साहात विसर्जन
पणजी : महागाईची पर्वा न करता, धो धो कोसळणाऱ्या पावसातही गोव्यात गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे. उत्सवप्रिय असलेल्या गोमंतकीयांच्या गणेशभक्तीमध्ये पावसाचा व्यत्यय येत असला तरीही गणेशोत्सव धुमधडाक्यात सुरु आहे. काल रविवारी पाच दिवसांच्या गणरायाला उत्साहात भाविकांनी निरोप दिला. पाच दिवसांचे विसर्जन थाटात व्हावे, या उद्देश्याने राज्यातील विसर्जनस्थळी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रविवारी संध्याकाळनंतर पाच दिवसांच्या घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी भाविकांनी वाहनांना सजवून त्यात श्री गणरायाला विराजमान केले होते. राज्यातील विविध भागात स्थायिक झालेल्या परराज्यातील भाविकांनी आपल्या घरगुती पाच दिवसांच्या गणरायाचे संध्याकाळी चार वाजल्यानंतर विसर्जनस्थळी गणेशमूर्ती आणल्या होत्या. मूळ गोव्यातील गणेशभक्तांनी वाड्या वाड्यावरील पाच दिवसांचे गणपती एकत्रितरित्या वाहनात ठेवून टाळ-मृदंगाच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या.
श्री गणरायावर आधारीत गाणी गात गात या मिरवणुक विसर्जनस्थळी पोहोचल्या. पंचायत क्षेत्रातील विसर्जनस्थळावर पंचायतीमार्फत वीजपुरवठा करण्यात आला होता. विद्युत रोषणाई, पताके लावून विसर्जनस्थळे सजविण्यात आली होती. पालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर पालिकेनेही भाविकांना गणपतीचे विसर्जन थाटात करता यावे, यासाठी सोय केली होती. काही भाविकांनी श्री गणरायाच्या मूर्तीसमवेतच गौरीचेही विसर्जन केले. गौरीचे विसर्जन घरच्या तुळशीवृंदावनात करण्याची प्रथा गोव्यात आहे. राजधानी पणजीत पाटो, सांताक्रुज, मिरामार समुद्रकिनारा तसेच नदी परिवहन खात्यातर्फे फेरीबोटीतून मांडवी पात्रात श्री गणरायाच्या विसर्जनाची सोय केली होती.









