बेळगाव : अभिजात मराठी संस्थेतर्फे सुरू असलेल्या मराठी आनंद मेळाव्यामध्ये शुक्रवारी सकाळी फ्रेंड्स सर्कलतर्फे मंगळागौरीचे खेळ सादर केले. गजाननाला आवाहन करताना महिलांनी ठेक्यात लेझीम सादर केले. त्यानंतर मंगल कलश म्हणून घागर घुमवली. मंगळागौरीच्या खेळाचा महत्त्वाचा घटक असलेला झिम्मा त्या खेळल्या. त्यानंतर पिंगा, भेंडीभोवर, किकीच पान, अगग सूनबाई, आई मी येऊ का, काचकिर्डा, खिस बाई खिस, तिखट मीठ मसाला, दहीवडा-बटाटे वडा, गौराई, अटुश पान, खुर्ची का मिर्ची, झोपाळा, गाठोड असे विविध खेळ महिलांनी सादर केले. त्यांच्या चपळ व तितक्याच लवचिक हालचाली व सांघिकतेमधून झालेले उत्कृष्ट सादरीकरण यामुळे या खेळांनी टाळ्या मिळविल्या. विठ्ठल नामाच्या गजराने याची सांगता झाली. कार्यक्रमाचे गायन व निवेदन मनाली कुलकर्णी, सुश्मा भिडेंनी केले.
पथनाट्या
यानंतर ‘आम्ही कचऱ्याच्या गं सखी’ या विषयावर पथनाट्या सादर केले. कचरा वेचकांच्या समस्या, त्याचे दुष्परिणाम, प्लास्टिकचा वापर, त्यामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान याचा नेमका आढावा पथनाट्यात घेतला. कमीतकमी कचरा निर्माण करणे व कचरा वेचकांचा सन्मान राखणे या टप्प्यावर पथनाट्याची सांगता झाली. त्यापुढील सत्रात विनायक मोरे यांनी समूह गायनाचे सादरीकरण कसे असावे? याचे प्रात्यक्षिक दाखविले. दुसऱ्या सत्रामध्ये समृद्धी सांबरेकर, आकांक्षा पावशे, सृष्टी देसाई, समृद्धी पाटील, साईराज गुरव यांनी कथाकथन सादर केले. अनुष्का पाटील, लावण्या सुंडीकर यांनी नाट्याछटा सादर केली. स्वरा, श्रीषा मोरे यांनी भक्तीगीत सादर केले. व्यासपीठावर स्वरुपा इनामदार व सुनिता देशपांडे उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी सादरीकरण उत्तम केले. त्यांचे पाठांतरही उत्तम होते. सूत्रसंचालन भारती सावंत यांनी केले.









