बंद रस्ता खुला करण्याची संघटनेची मागणी
बेळगाव : वडगाव येथील मंगाईनगरला जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. तो रस्ता तातडीने सुरू करावा, यासाठी मंगाईनगर रहिवासी संघटनेच्यावतीने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग यांना न विचारता तसेच कोणतीही परवानगी न घेता, सर्व्हे न करता बेकायदेशीररीत्या बांधकाम करण्यात आले आहे. रस्त्याच्या मधोमधच काँक्रिटची भिंत बांधण्यात आली आहे. त्यामुळे मंगाईनगर येथील रहिवाशांना ये-जा करणे अवघड झाले आहे. त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वीपासून हा रस्ता होता. मात्र अचानकपणे हा रस्ता अडविण्यात आल्यामुळे समस्या निर्माण झाली असून तातडीने रस्ता खुला करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
केवळ त्रास देण्यासाठी बांधकाम केल्याचा आरोप
मंगाईनगर येथे 2 हजारांपेक्षा अधिक लोकवस्ती आहे. असे असताना हा रस्ता अडविण्यात आला आहे. या रस्त्याची जमीन बाळकृष्ण काळोजीराव चव्हाण- पाटील, अनिलकुमार काळोजीराव चव्हाण-पाटील, सुनील काळोजीराव चव्हाण-पाटील यांची आहे. ते जमीन देण्यास तयार आहेत. तरीदेखील नाहक त्रास देण्यासाठी बांधकाम करण्यात येत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. तेव्हा संबंधित महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना करून आम्हाला रस्ता खुला करून द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे. यावेळी मंगाईनगर, रहिवासी संघाचे अध्यक्ष बंडू केरवाडकर, रमाकांत कोंडुस्कर, नगरसेवक रवी साळुंखे, श्रीधर बिर्जे, आनंद गोंधळी, भालचंद्र उचगावकर, रेखा लोकरी, छाया नरगुंदकर, रेखा सुरेकर, सुरेखा सांगलीकर, सहदेव रेमाण्णाचे, सागर पाटील, महेश पोटे, प्रशांत हतगोजी, शकुंतला बिर्जे, सुजाता उचगावकर व इतर उपस्थित होते.









