ओटी भरण्यासाठी महिलांची गर्दी : वाहतुकीची कोंडी : वडगाव परिसरात स्वागत फलक-विद्युत रोषणाई
प्रतिनिधी /बेळगाव
महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱया मंगाई देवीची यात्रा मंगळवारी मोठय़ा भक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात पार पडली. मंगाई देवीचे दर्शन घेण्यासाठी व ओटी भरण्यासाठी मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी झाली होती. सायंकाळनंतर मात्र वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
कोरोनामुळे मागील दोन वर्षात यात्रेवर निर्बंध आले होते. मंदिर परिसरातही प्रवेश दिला जात नव्हता. यावषी मात्र निर्बंध हटविण्यात आल्याने यात्रा उत्साहात साजरी करण्याचा निर्णय देवस्थानचे हक्कदार व वडगाव येथील नागरिकांनी घेतला होता.
सोमवारी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. वडगाव परिसरातील सर्वच गल्ल्यांमध्ये स्वागत फलक व विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
मंगळवारी पहाटेपासून भाविकांची रिघ मंदिर परिसरात सुरू झाली. पूजा साहित्यांची दुकाने थाटण्यात आली होती. भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. पावसाने उसंत घेतल्यामुळे दर्शन घेणे व यात्रा करणे सोयीचे झाले. दुपारी चव्हाण पाटील घराण्यातील हक्कदारांकडून गाऱहाणे उतरविण्यात आले. गाऱहाणे उतरविल्यानंतर भाविकांना दर्शन खुले करण्यात आले.
रात्री उशीरापर्यंत चालली यात्रा
गाऱहाणे उतरविल्यानंतर पोळीचा गोड नैवेद्य करण्यात आला. सायंकाळनंतर वडगाव परिसरात भाविकांची गर्दी वाढू लागली. ओटी भरण्यासाठी महिलांची गर्दी झाल्याचे दिसून आले. रात्री जेवणासाठी येणाऱया भाविकांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. वडगाव मुख्य रस्ता, येळ्ळूर रस्ता, बाजार गल्ली, विष्णू गल्ली, राजवाडा कंपाऊंड, पाटील गल्ली, कारभार गल्ली, नाझर कॅम्प या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. रात्री उशीरापर्यंत यात्रेत भाविकांची गर्दी होती.
यात्रेमुळे मिळाला रोजगार
बेळगाव परिसरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून वडगावच्या मंगाई देवीची यात्रा ओळखली जाते. नवस फेडण्यासाठी भाविकांकडून कोंबडय़ा, बकरी यांची मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्यात आली. येळ्ळूर रोड परिसरात गावठी केंबडय़ा विकण्यासाठी बाहेरून व्यापारी दाखल झाले होते. त्याचबरोबर खाद्य पदार्थांचे स्टॉल, खेळणी, गृहोपयोगी वस्तू यांची विक्री करणारे स्टॉल उभे करण्यात आले होते. लहान लहान विपेत्यांना यात्रेमुळे रोजगार मिळाल्याने त्यांच्या चेहऱयावरही आनंद होता.









