प्रतिनिधी/ बेळगाव
शेतकऱ्यांची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वडगावच्या मंगाई देवीची यात्रा मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मंगाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी वडगाव परिसर फुलला होता. मंदिराला फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती.
वडगावचे ग्रामदैवत मंगाई देवीची यात्रा मंगळवार दि. 11 रोजी भक्तिभावाने साजरी झाली. सकाळपासून मंदिर परिसरात भाविकांची गर्दी झाली होती. गाऱ्हाणे उतरविल्यानंतर मुख्य यात्रेला सुरुवात झाली. मानकरी चव्हाण-पाटील कुटुंबीयांच्यावतीने पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. दुपारनंतर मंदिर परिसरात गर्दी वाढत गेली. सायंकाळी गर्दीने वडगावचे रस्ते फुलले होते.
नवस फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोंबडे, कोंबड्यांची पिल्ले, बकरी यांची खरेदी सुरू होती. फिरते विक्रेते गल्लोगल्ली फिरून कोंबड्यांची विक्री करीत होते. याचबरोबर हार, नारळ, फुले, अगरबत्ती विक्री करणारे स्टॉल मंदिर परिसरात होते. यात्रेनिमित्त लहान मुलांसाठी अनेक खेळ दाखल झाले आहेत. आकाश पाळणा, ब्रेक कार यासह खेळ खेळण्यासाठी लहान मुलांची गर्दी झाली होती. खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर खवय्यांची रिघ लागली होती. याचबरोबर गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्याकडे महिलांचा भर होता.
जागोजागी बॅरिकेड्स
यात्रेसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने जागोजागी बॅरिकेड्स लावले होते. येळ्ळूर क्रॉस, बाजार गल्ली कॉर्नर, मंदिर परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आले होते. एरव्ही विष्णू गल्ली कॉर्नरपर्यंत जाणारी सिटी बस मंगळवारी येळ्ळूर रोड कॉर्नरपासून वळविली जात होती. नाझर कॅम्प परिसरात वाहतूक कोंडी झाल्याने येळ्ळूर, सुळगा गावांकडे जाणाऱ्या बस अडकून पडल्या होत्या.
वाहतूक कोडींने भाविकांतून नाराजी
दुपारनंतर वडगाव भागात भाविकांची मोठी गर्दी झाली. मुख्य रस्त्यावरच दुचाकी व चार चाकी वाहने लावण्यात आल्याने प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. बेशिस्त पद्धतीने लावण्यात आलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडली. नाझर कॅम्प, वझे गल्ली, बाजार गल्ली, विष्णू गल्ली, धामणे रोड, येळ्ळूर रोड, पाटील गल्ली, कारभार गल्ली, यरमाळ रोड आदी भागांमध्ये सायंकाळी 6 नंतर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहने कोठून बाहेर काढायची, असा प्रश्न वाहन चालकांसमोर होता.









