पुणे / प्रतिनिधी :
‘Mandos’ will hit near Mahabalipuram tonight बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘मॅन्दोस’ चक्रीवादळ आज रात्री (9 डिसेंबर) पूर्व किनारपट्टीवरील पाँडेचरी ते श्रीहरीकोटादरम्यान असलेल्या महाबलीपूरमजवळ धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
मॅन्दोस वादळ बंगालच्या उपसागरात पश्चिम-उत्तर पश्चिमेच्या दिशेने ताशी 12 किमी वेगाने प्रवास करीत असून, शुक्रवारी सकाळपर्यंत या वादळाची तीव्रता आणखी वाढणार आहे. मात्र किनारपट्टीला धडकेपर्यंत याची तीव्रता थोडी कमी झालेली असेल. तामिळनाडू, पाँडेचरी तसेच दक्षिण आंध्र किनारपट्टीच्या दरम्यान असलेल्या पाँडेचरी व श्रीहरीकोटामधील महाबलीपूरमच्या आसपास किनारपट्टीला ताशी 75 ते 85 किमी वेगाने हे वादळ धडकणार आहे. यासाठी सर्व स्थानिक यंत्रणा, एनडीआरएफ यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छीमारांना आधीपासूनच समुद्रात न जाण्याची सूचना देण्यात आली आहे. दरम्यान, या वादळाच्या प्रभावामुळे आंध्र किनारपट्टी, तेलंगणा तसेच तामिळनाडूत मुसळधार पाऊस होत आहे. या भागात गुरुवारी ऑरेंज अलर्ट होता, तर तामिळनाडूला शुक्रवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे. शनिवारी या वादळाचा प्रभाव कमी होऊन त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होईल. या भागात पावसाची तीव्रता मात्र दोन ते तीन दिवस राहणार आहे.
राज्यात ढगाळ वातावरण, सूर्यदर्शन नाही
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील थंडी गायब झाली असून, गुरुवारी सर्वत्र ढगाळ वातावरण होते. सूर्यदर्शनही दिवसभर होऊ शकलेले नाही. याचा प्रभाव पुढील दोन ते तीन दिवस राज्यभर राहणार आहे. पुढील तीन दिवस राज्यभर पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच वादळाचा परिणाम नाशिक, खान्देश, मध्य प्रदेश तसेच छत्तीसगडच्या काही भागात जाणवणार आहे.