बीएलओंकडे अर्ज उपलब्ध : घरातूनच मतदान करण्याची सुविधा
बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान करण्याबाबत जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा, याकरिता निवडणूक आयोगाकडून प्रयत्न सुरू आहेत. वृद्ध नागरिकांना तसेच दिव्यांगांना घरातूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पोस्टल बॅलेटद्वारा मतदान करण्यासाठी दि. 13 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. अनेकदा मतदान करण्यासाठी वृद्ध नागरिकांना मतदान केंद्रांवर जात येत नाही. काहीवेळा दिव्यांगांनादेखील मतदान केंद्रावर ये-जा करण्यास अडचण भासते. वृद्ध नागरिकांना रिक्षा किंवा अन्य खासगी वाहनातून मतदान करण्यासाठी केंद्रांवर आणले जाते. त्यामुळे त्यांच्यावर दबाव येण्याची शक्यता असते. कोणत्याही भीतीच्या छायेखाली मतदान करू नये, याकरिता निवडणूक आयोगाने विशेष खबरदारी घेतली आहे. वृद्ध आणि दिव्यांगांनी मतदानाचा हक्क न बजावल्यास मतदानाच्या टक्केवारीत घट होत आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक विभागाकडून जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत आता वृद्ध नागरिकांना पोस्टल बॅलेटद्वारा मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
80 वर्षांहून अधिक वृद्ध मतदारांची यादी तयार
80 वर्षांहून अधिक वृद्ध मतदारांची यादी तयार केली आहे. तसेच पोस्टल बॅलेटद्वारा मतदान करण्याकरिता बीएलओंमार्फत अर्ज भरून घेण्यात येत आहेत. दिव्यांग आणि वृद्ध नागरिकांना पोस्टल बॅलेटद्वारा मतदान करण्याकरिता अर्ज करणे बंधनकारक आहे. त्यामुळे बीएलओंमार्फत चौकशी करून अर्ज देण्यात येत आहेत. हे अर्ज दि. 13 एप्रिलपर्यंत देणे बंधनकारक आहे. 13 एप्रिलपर्यंत अर्ज दिल्यानंतरच पोस्टल बॅलेटद्वारा मतदान करता येणार आहे. त्यामुळे वृद्ध नागरिकांनी व दिव्यांगांनी सुविधेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.









