बेळगाव : डेंग्यू आजाराची मोठ्या प्रमाणात लागण होत आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी आरोग्याधिकाऱ्यांनी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये डेंग्यू तपासणी करण्यात यावी, अशी सूचना जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केली. जिल्हा पंचायत कार्यालयामध्ये शनिवारी आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या राष्ट्रीय योजनांचा विकास आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यामध्ये जानेवारी 2024 ते जुलैअखेरपर्यंत 1757 डेंग्यू चाचण्या घेतल्या आहेत. यामध्ये 260 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. यासाठी आरोग्य खात्याकडून आणि आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी भेट देऊन डेंग्यू आजाराबाबत नागरिकांमध्ये जागृती केली जात आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पूर्वखबरदारी घ्यावी.
डेंग्यू चाचणी व्हावी यासाठी आरडीके किट उपलब्ध करून द्यावेत. मुलांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्यात यावे. त्यांच्यासाठी असणाऱ्या विविध लस देऊन आरोग्य जपावे. यामध्ये आरोग्य आणि महिला व बालकल्याण खात्याने समन्वयाने काम करावे, अशी सूचना त्यांनी केली. सदर अधिकाऱ्यांनी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी बैठक घेऊन राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती समन्वयाने सादर करावी. कुपोषणामुळे मुलांचे आरोग्य बिघडत आहे. अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून कुपोषित बालकांना सकस आहार पुरविण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जि. पं. विकास विभागाचे उपकार्यदर्शी बसवराज अडवीमठ, योजनाधिकारी गंगाधर दिवटर, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोनी, जिल्हा अप्पर आरोग्याधिकारी डॉ. एस. एस. गडेद, जिल्हा शस्त्रचिकित्सक डॉ. व्ही. व्ही. शिंदे, जिल्हा आयुष अधिकारी श्रीकांत सुनधोळी, जिल्हा आरसीएच डॉ. चेतन कंकणवाडी, जिल्हा क्षयरोग नियंत्रणाधिकारी डॉ. चांदणी देवडी आदी उपस्थित होते.









