स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शेडची उभारणी
प्रतिनिधी /बेळगाव
उपनगरातील रहिवाशांना खरेदीसाठी बाजारपेठेत किंवा भाजीमंडईच्या ठिकाणी धाव घ्यावी लागते. विशेषत: महांतेशनगर, रामतीर्थनगर आणि रुक्मिणीनगर परिसरातील रहिवाशांना शहरात धाव घ्यावी लागते. याची दखल घेऊन रुक्मिणीनगर आश्रय कॉलनीतील रहिवाशांसाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत भाजीमंडईची सुविधा उपलब्ध करण्यासाठी शेडची उभारणी केली आहे.
रुक्मिणीनगर येथील आश्रय कॉलनीतील रहिवासी मागासवर्गीय आहेत. येथील रहिवाशांना नेहमी शहरातील बाजारपेठेत येवून भाजीपाला खरेदी करणे परवडणारे नाही. या भागात भाजीमंडई उपलब्ध करण्यात आली नसल्याने शहरात येण्याशिवाय पर्याय नाही. काही ठिकाणी भाजी विक्रेत्यांची दुकाने आहेत. मात्र चढ्या दराने भाजीपाला विक्री केला जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही. विशेषत: रुक्मिणीनगर आश्रय
कॉलनीतील रहिवाशांना महागाईच्या काळात चढ्या दराने भाजीपाला खरेदी करणे अशक्य आहे. त्यामुळे आश्रय कॉलनीतील रहिवाशांसाठी भाजीमंडईची सुविधा उपलब्ध करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रुक्मिणीनगर येथील जागेत शेडची उभारणी करण्यात आली आहे. याठिकाणी 6 गाळे निर्माण करण्यात आले असून, अद्याप भाजीपाला विक्री सुरू करण्यात आली नाही. मात्र येत्या काही दिवसांत याठिकाणी भाजीमंडई सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. सदर वसाहत महापालिका व्याप्तीत येत असल्याने महापालिकेकडून गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. याठिकाणी भाजीपाला विक्री करण्याची सुविधा उपलब्ध केल्यास आश्रय कॉलनीतील रहिवाशांना सोयीचे ठरणार आहे.









