वृत्तसंस्था /लंडन
मँचेस्टर सिटीने पेनल्टी शूटआऊटमध्ये युरोपा लीग चॅम्पियन सेव्हिलाचा पराभव करून प्रथमच FA सुपर कप विजेतेपद पटकावले आहे. अथेन्समध्ये 16 ऑगस्ट रोजी झालेल्या अंतिम सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला. पूर्णवेळपर्यंत सामना 1-1 असा बरोबरीत होता. यानंतर मँचेस्टर सिटीने पेनल्टी शूटआऊटमध्ये सेव्हिलाचा 5-4 असा पराभव करत सुपर कप जिंकला. विशेष म्हणजे, बार्सिलोना, मिलान आणि रिअल माद्रिद या संघांनी आतापर्यंत प्रत्येकी पाच वेळा ट्रॉफी जिंकली आहे. यंदा मात्र मँचेस्टर सिटीने प्रथमच या स्पर्धेचे जेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी साकारली आहे. सेव्हिलाच्या युसेफ एन-नेसिरीने (25 व्या मिनिटाला) पहिल्या हाफमध्ये अप्रतिम हेडर करत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर 63 व्या मिनिटाला सिटीच्या कोल पामरने हेडरद्वारे गोल करत संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. यानंतर दोन्ही संघांना निर्धारित वेळेपर्यंत गोल करता आला नाही. यामुळे सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. यावेळी मँचेस्टर सिटीने शानदार कामगिरी करताना 5-4 असा विजय मिळवला. विशेष म्हणजे, FA सुपर कपचा हा 48 वा हंगाम आहे. ही युरोपियन युनियन ऑफ फुटबॉल असोसिएशन (FA) द्वारे आयोजित केले जाते. हंगामात या स्पर्धेत फक्त एकच सामना खेळला जातो. हा सामना हंगामातील FA चॅम्पियन्स लीगचा विजेता (मँचेस्टर सिटी विजेता) आणि FA युरोपा लीग (सेव्हिला विजेता) यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात सिटीने बाजी मारताना सेव्हालाला पराभवाचा धक्का दिला.









