वृत्तसंस्था/ दोहा, कतार
मानव ठक्करने जपानचा जागतिक चौथा मानांकित हारिमोटो तोमोकाझूविरुद्ध झुंजार लढतीनंतरही पराभव स्वीकारावा लागल्याने टेबल टेनिस वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील त्याचे आव्हान संपुष्टात आले. याशिवाय महिला एकेरीत मनिका बात्रालाही स्पर्धेबाहेर पडावे लागले.
48 व्या मानांकित मानव ठक्करने आपल्यापेक्षा सरस असलेल्या जपानच्या तोमोकाझूविरुद्ध तिसऱ्या व पाचव्या गेममध्ये चमकदार व तोडीस तोड खेळ केला. पण शेवटी त्याला 11-13, 3-11, 11-9, 6-11, 11-9, 3-11 असा पराभव स्वीकारावा लागला. पराभूत झाला असला तरी आपल्या परफॉर्मन्सवर तो समाधानी झाला असेल. कारण या सामन्यात तो अनेक दीर्घ रॅलीजमध्ये हरिमोटोवर भारी पडल्याचे दिसून आले.
महिला एकेरीत 46 व्या मानांकित मनिका बात्रा जागतिक क्रमवारीत 130 व्या स्थानावर असणाऱ्या दक्षिण कोरियाच्या पार्क गाह्योऑनकडून पराभूत झाली. मनिकाने फोरहँडवर अनेकदा अनियंत्रित चुका केल्या. शेवटी तिला 8-11, 7-11, 5-11, 8-11 असा पराभव स्वीकारावा लागला. काही वेळानंतर 88 व्या मानांकित दिया चितळेलाही तिची तैपेईच्या चेन चिंगच्या दर्जाची बरोबरी करता आली नाही. ती 7-11, 6-11, 11-6, 5-11 अशी पराभूत झाली.









