अध्याय सातवा
बाप्पांना भक्ताची अत्यंत आवड असल्याने ते आपल्या भक्तांसाठी समाधीमार्ग सोडून अन्य सोपा उपाय म्हणून त्यांची मनोभावे पूजा करायला सांगतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी षोडशोपचारे पूजा करावी. ज्यांना ते शक्य नाही त्यांनी पान, फुल, फळ अशा ज्या सहजी मिळणाऱ्या वस्तू मनोभावे बाप्पांना अर्पण करत राहिलं तरी बाप्पा प्रसन्न होतात व अशा भक्तांची चित्तशुद्धी साधून देतात. भगवदगीतेच्या नवव्या अध्यायातही भगवंत अर्जुनाला सांगतात, पत्र वा पुष्प जो प्रेमे फळ वा जळ दे मज । ते त्या पवित्र भक्ताचे अर्पिले खाय मी सुखे ।।9.26 ।।
त्याच्याही पुढे जाऊन बाप्पांची भक्ती करण्यासाठी मानसपूजा हे अत्यंत महत्त्वाचे साधन बाप्पा सांगतात. षोडशोपचारे पूजा, जी वस्तू उपलब्ध आहे ती बाप्पांना अर्पण करून केलेली पूजा व मानसपूजा यात मानसपूजा सर्वश्रेष्ठ आहे, असा निर्वाळा बाप्पा देतात. या पूजेत भक्ताचे संपूर्ण चित्त बाप्पांच्या सगुण रुपाशी एकरूप होते. मानसपूजा करण्यासाठी मनाशिवाय इतर कोणत्याही साधनाची आवश्यकता नसते. षोडशोपचार पूजेसाठी जी सामग्री प्रत्यक्षात गोळा केली जाते ती मानसपूजेत मनातल्या मनात गोळा करून मनानेच पूजा करायची असते. षोडशोपचारे करावयाच्या पूजेत आवश्यक ते सर्व साहित्य गोळा करणे श्रमाचे आणि खर्चिक असते तर मानसपूजेत या सर्व साहित्याच्या संकलनाची मनाने कल्पना करून बाप्पांची पूजा करायची असते. त्यामुळे दुर्लभ साहित्यसुद्धा सहजी गोळा केले जाते. मानसपूजेत बाप्पांच्या सगुण मूर्तीशी भक्त लवकर एकाग्र होतो.
श्रीमत शंकराचार्य यांनी शिव-मानस-पूजा स्तोत्र-संस्कृतमध्ये रचले आहे त्याचा मराठी भावानुवाद भारती बिर्जे डिग्गीकर यांनी केलेला आहे तो पुढे देत आहे. त्यावरून मानसपूजेसाठी किती नामांकित साहित्य स्वामीजींनी गोळा केलं आहे व नंतर पूजा करून प्रार्थना केली आहे त्याचा सविस्तर तपशील मिळतो. मानसपूजा कशी असावी त्याचं उत्तम मार्गदर्शन या स्तोत्रातून आपल्याला मिळतं.
श्रीशंकर शिवप्रभो बसावे रत्नखचित मानससिंहासनी, मनोमनी स्नानार्थ आणले हिमगिरीचे सुखशीतल पाणी, दिव्य वस्त्र मग वेढून घ्यावे संध्यारंगासम झळझळते, कस्तुरीचंदन तुला लावतो सुगंधात त्या विश्व नाहते, पापनाशनी धूप जाळुनी राशी रचली बिल्वदलांची, कितीक सुंदर, अर्धोन्मीलित फुले जाईची अन चाफ्याची, स्वामी मंगलदीप लावतो दीपोत्सव होऊ दे अंतरी नमन नमन तुज पार्वतीपते मानसपूजा ही स्वीकारी।
सुवर्णपात्रही मनी कल्पिले रत्नांची त्यावरती दाटी, दह्यादुधातील पंच पाककृती खीर तूप सारे तुजसाठी, रसाळ भाज्या मधूर पाणी गोड फळे स्वामी सेवावी, भोजनोत्तरी विडा कर्पुरी भक्षुनिया मुखशुद्धी व्हावी, मानसीच्या विश्रामगृही प्रभू आता तव होऊ दे आगमन, मस्तकी धरतो छत्र, सुलक्षण चवरीने तुज वारा घालीन, स्फटिकासम चौफेर आरसे तुझे रूप हृदयाशी धरती, स्वर वीणेचे ताल मृदंगी गीतनृत्य भुवनातून भरती, पुन:पुन: तुज नमितो येथे स्तवनांनी लववितो वैखरी, नमन नमन तुज पार्वतीपते मानसपूजा ही स्वीकारी ।
तू आत्मा मम, बुद्धीरुपाने देवी उमा अंतरी विराजे, प्राण तुझे सहचर शिवनाथा शरीर घर हे तुझेच साजे, विषयभोग मी घेतो जे जे तुझी शंकरा पूजा ती ती, निद्रा जी भरते नयनांतून सहजसुखाची समाधिस्थिती, पायांना जी घडे भ्रमंती तुझी कृपाळा ती प्रदक्षिणा, वाचेला स्फुरते जी भाषा तुझे स्तवन हे हे दयाघना, या देहातून या मनामध्ये तुझीच लीला तुझीच सत्ता
मी जे कर्म करावे ते ते तव आराधन हो प्रभुनाथा, या हातांनी, या चरणांनी, या वाणीने, या कर्णांनी, या कायेने अनुचित कर्मे जी आचरिली पूर्ण जीवनी, हे करुणाकर! महादेव हे! अपराधांना प्रभू क्षमा करी, नमननमन तुज पार्वतीपते मानसपूजा ही स्वीकारी ।








