मॅजिक स्पोर्ट्स उपविजेता, सीएसआरएफ व रेग एफसी यांना तिसरे व चौथे स्थान
बेळगाव : फॅब स्पोर्ट्स क्लब आयोजित फॅब लीग 14 वर्षांखालील आंतरक्लब फुटबॉल स्पर्धेत गुणाच्या आधारे मानस स्पोर्ट्स अकादमीने विजेतेपद, मॅजिक स्पोर्ट्स क्लबने उपविजेतेपद, सीएसआरएफ अकादमीने तिसरे तर रेग एफसीला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. हसन जमादार याला उत्कृष्ट खेळाडू तर प्रवीण सावंत याला उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून गौरविण्यात आले. मंडोळी रोड येथील सक्षम स्पोर्ट्स टर्फ मैदानावर खेळविण्यात आलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात रेग एफसीने बोफा संघाचा 3-0 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात पायोनियर क्लबने एमव्हीएमचा 3-0, रिगीमा क्लबने ग्रो स्पोर्ट्स क्लबचा 2-0, मॅजिक स्पोर्ट्सने बिटा संघाचा 4-0 तर मानस स्पोर्ट्स अकादमीने सीएसआरएफचा 3-0 असा पराभव केला. सर्व साखळी सामन्यानंतर गुणाच्या आधारे मानस स्पोर्ट्स फुटबॉल अकादमीला विजेता घोषित करण्यात आले. मॅजिक स्पोर्ट्स क्लबने उपविजेतेपद, सीएसआरएफ संघाने तिसरा क्रमांक तर रेग एफसीने चौथा क्रमांक मिळविला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील उद्योजक सागर निलजकर, विराट हॉटेलचे संचालक कपिल भोसले, निखिल कांबळे, विजय रेडेकर, ओमकार खांडेकर आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या मानस नायक स्पोर्ट्स अकादमीला, उपविजेत्या मॅजिक, तिसरा क्रमांक सीएसआरएफ व रेग एफसी संघाला चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. उत्कृष्ट खेळाडू म्हणून हुसेन जमादार (मानस अकादमी), उत्कृष्ट गोलरक्षक प्रणव सावंत (एमव्हीएम), उत्कृष्ट डिफेंडर श्रीअंगडी (रेग एफसी), उत्कृष्ट मिडफिल्डर ध्रुव गावडे (सीआरएफ), उत्कृष्ट फॉरवर्ड सकलीन मुल्ला (मॅजिक स्पोर्ट्स), शिस्तबद्ध संघ एमव्हीएम, उत्कृष्ट कोच म्हणून अखिलेश अष्टेकर (मॅजिक स्पोर्ट्स) यांना गौरविण्यात आले. यावेळी शुभम यादव, विवेक सनदी, मयुर पालेकर आदी उपस्थित होते.









