विकासाकडे लक्ष देणार का?, सर्वसामान्य जनतेचा प्रश्न
बेळगाव : शहरातील ब्लॅकस्पॉट हटविण्यासाठी महापालिकेने आणि विशेष करून महापालिका आयुक्तांनी प्रयत्न केले. शहरातील बरेच ब्लॅकस्पॉट हटविले. ही मोहीम सुरू असतानाच महापालिकेतील सत्ताधारी व विरोधी गटातील राजकारण तापले. त्यामुळे ब्लॅकस्पॉट हटाव मोहीम पूर्णपणे थांबली आहे. सध्या सर्वत्र कचऱ्याची उचल वेळेत होत असली तरी काही ठिकाणी अजूनही ब्लॅकस्पॉट आहेत. ते हटविणे गरजेचे आहे. मात्र राजकारणामुळे शहरातील सर्वच विकास कामे सध्या थंडावली आहेत. यामुळे शहरवासीयांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्मार्टसिटी अंतर्गत शहरामध्ये विविध विकास कामे केली. पण ती निकृष्ट दर्जाची केल्याने याबाबत जोरदार आरोप करण्यात येत आहेत. कचरा समस्याही गंभीर बनत चालली होती. त्यानंतर मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी पहाटेच शहराचा दौरा करून कचऱ्याची उचल वेळेत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नाला बरेच यशही आले. मात्र आता त्यांच्यावर आरोप केल्यामुळे त्यांनी ही मोहीम थांबविल्याचे दिसते.
कचरा उचल वेळेत होत नसल्याच्या तक्रारीत वाढ
पहाटेच विविध प्रभागामध्ये जाऊन कचऱ्याची उचल करण्याबाबत सफाई कर्मचाऱ्यांना ते सूचना करत होते. कचऱ्याचे वर्गीकरण देखील करण्यात येत होते. सध्या हे वर्गीकरण होत असले तरी कचऱ्याची उचल काही ठिकाणी वेळेत होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मनपातील राजकारणाचा परिणाम आता विकासांवर होताना दिसत आहे. आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी शहर स्वच्छ करण्यासाठी प्राधान्य दिले होते. याचबरोबर विविध प्रकल्प राबवून कचऱ्याची विघटन कसे होईल, याकडे देखील लक्ष दिले होते. मात्र काही दिवसांपासून महापालिकेमधील राजकारण तापल्याने सारीच कामे थंडावली आहेत.
आरोप-प्रत्यारोपात विकासाला मात्र खिळ
महापालिकेने करवाढ केली नाही म्हणून नगर प्रशासन संचनालयाकडून नोटीस आली. त्यानंतर राजकारण चांगलेच तापले. नोटीस येण्याआधी सर्वसाधारण सभा घेऊन कर वाढीचा ठराव करण्यात आला होता. त्याला सर्वांनीच मान्यता दिली होती. तो प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र त्या प्रस्तावावर तारखेचा उल्लेख चुकीचा झाला. त्यामुळे सत्ताधारी गटातून त्याचे राजकारण करण्यात आले. तर त्या प्रस्तावावर महापौरांची स्वाक्षरी असल्यामुळे महापौर शोभा सोमणाचे यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधी गटाच्या नगरसेवकांनी देखील जोरदार आवाज उठविला. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप झाले. या सर्व प्रकारामुळे विकासाला मात्र खिळ बसली आहे.
महापालिकेतील राजकारण शिगेला
शहरामध्ये अनेक कामे अर्धवट आहेत. ती कामे पूर्ण करावीत, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहेत. नुकतीच स्मार्टसिटी अंतर्गत झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक बेळगावात दाखल झाले होते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी जनतेने केल्या आहेत. एकूणच यापूर्वी खर्च करण्यात आलेला संपूर्ण निधी वाया गेल्याचा आरोप जनतेतून होत आहे. यातच महापालिकेमध्येही राजकारण शिगेला पोहोचल्यामुळे त्याचा परिणाम शहराच्या विकासकामांवर होण्याची भीती आता व्यक्त होत आहे.









