माना पटेल/ वृत्तसंस्था / हैदराबाद (तेलंगणा)
येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशिप स्पर्धेत दुसऱ्या दिवशी महिलांच्या 100 मी. बॅकस्ट्रोक प्रकारात माना पटेलने नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक पटकाविले.
या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताची ऑलिम्पियन जलतरणपटू माना पटेल व अन्य काही जलतरणपटूंनी विविध प्रकारात नवे स्पर्धाविक्रम केले. महिलांच्या 200 मी. ब्रेस्टस्ट्रोक जलतरण क्रीडा प्रकारात ए. के. लिनेशाने नवा स्पर्धा विक्रम केला. महिलांच्या 100 मी. बॅकस्ट्रोक प्रकारात माना पटेलने 1 मिनिट, 03.48 सेकंदाचा अवधी घेत तसेच ए. के. लिनेशाने महिलांच्या 200 मी. बॅकस्ट्रोकमध्ये 2 मिनिटे, 37.35 सेकंदाचा अवधी घेत नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदके मिळविली. महिलांच्या 50 मी. बटरफ्लायमध्ये निना व्यंकटेशने नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला. तिने या क्रीडा प्रकारात 28.01 सेकंदाचा अवधी घेतला. सदर स्पर्धा 5 जुलैपर्यंत चालणार आहे. हैद्राबादमध्ये सुरु असलेली ही स्पर्धा 76 वी राष्ट्रीय पुरुष आणि महिलांची जलतरण स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये फ्री स्टाईल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक, बटरफ्लाय, वैयक्तिक मिडले असे विविध प्रकार घेतले जात आहेत. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिसाठी विश्व जलतरण फेडरेशनने हैद्राबादमधील ही राष्ट्रीय वरिष्ठांची जलतरण स्पर्धा पात्रतेची म्हणून मान्यता दिली आहे.









