पुणे / वार्ताहर :
केसनंद रोड परिसरातील ॲपल कंपनीच्या गोडाऊनमधून 266 आयफोन चोरणाऱ्या टोळीतील एकाला लोणीकंद पोलिसांनी झारखंडमधून अटक केली. तर, त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. आरोपींनी एजंटच्या माध्यमातून मोबाईल विकल्याचे समोर आले आहे.
सलीम उर्फ असराऊल इस्माईल फजल शेख (35, रा. साहेबगंज, झारखंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 17 जुलै रोजी केसनंद रस्त्यावरील ॲपलच्या गोडाऊनमध्ये चोरीची घटना घडली होती. चोरटय़ांनी येथील गोडाऊनमधून 266 मोबाईल चोरी केले होते. पसार आरोपींचा लोणीकंद पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. गुन्ह्याची पद्धत आणि यापूर्वीच्या अशा काही गुन्ह्यांच्या टोळ्यांचा अभ्यास केल्यानंतर झारखंडमधील साहेबगंज भागातील टोळ्या सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार लोणीकंद पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक गजानन जाधव यांचे पथक झारखंडमधील साहेबंगज येथे गेले. मात्र, आरोपी पश्चिम बंगालमध्ये पळून गेल्याने मिळाले नाहीत. यानंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा पोलिसांचे पथक झारखंडला रवाना झाले. यावेळी सलीम शेख पोलिसांना मिळून आला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याची कबूली दिली. तसेच, हा मुद्देमाल आरोपीने एका एजंटच्या माध्यमातून विकल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून सलीमच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे









