अध्याय अठ्ठाविसावा
पारमार्थिक दृष्ट्या सजग असलेल्या आणि नसलेल्या व्यक्तींच्या मन:स्थितीत कोणता फरक असतो ते भगवंत उद्धवाला सांगत आहेत. ते म्हणाले, सर्व लोक जिथे आवडीने संसारसुखाचा आनंद घेत असतात, त्यावेळी ज्ञानी म्हणजे जागृत मनुष्य निद्रेत असतो कारण संसारातून कायम टिकणारे सुख मिळेल असं त्याला कधी वाटतंच नाही. त्यामुळे संसारसुखाचे क्षण वाट्याला आल्यावर तो इतरांच्याप्रमाणे आपणही आनंदात आहोत असे भासवेल पण मनातून तो त्यापासून अलिप्तच असतो. तसंच दु:खाच्या प्रसंगीही तो दु:खी झाल्याप्रमाणे दाखवेल पण मनातून तो स्थिर असतो. त्याच्या मन:स्थितीच आणखीन एक वैशिष्ट्या सांगायचं म्हणजे त्याला सर्वजण ईश्वररूप वाटत असतात. म्हणजे एकच ईश्वर अनेक रूपे घेऊन वावरत आहे असे तो समजतो. त्यामुळे त्या सर्वांची स्वभाव वैशिष्ट्यो आणि त्यानुसार असलेली वेगळी ओळख त्याच्या मनाला शिवतसुद्धा नाही. तो अनेकात एकत्व पहात असतो. लहान मुले खेळत असताना कुठल्यातरी झाडाची पाने मांडतात आणि त्यांनाच वडे, मांडे, खीर, तूप असे म्हणतात. ते झाडाच्या एकसारख्या पानातच अनेक गोष्टी पहात असतात. जीवन्मुक्त हेच करत असतात. त्यांच्या दृष्टीने सर्व जग व्यापून उरलेला ईश्वर हा एकच विषय असतो आणि त्यालाच ते अनेकात पहात असतात. म्हणजे त्याला वेगवेगळे अनेक लोक दिसतात पण शेवटी त्यात त्याला एकाच ईश्वराची प्रचीती येत असते. उद्धवा ह्यावरून स्पष्ट होते की, समोर दिसणाऱ्या व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती ह्या सर्व गोष्टी ईश्वराच्या मर्जीनुसार वागत असतात. जणू हा कठपुतळीचा खेळ चालू आहे. त्यातील सुत्रधाराप्रमाणे ईश्वर सर्व चराचराला, हवे तेव्हा निर्माण करू शकतो, हवे तसे रूप देऊ शकतो, त्याला वाटेल तेव्हा, वाटेल त्या गोष्टीचा नाशही करू शकतो. असं जर सगळं आहे तर दृढ झालेल्या देहाभिमानाची कास धरून, स्वत:ला कर्ता समजून जो मी आणि माझं ह्या विचारधारेला घट्ट धरून बसेल त्याला देहाभिमान होईल. अशा व्यक्तीला भवबंधन लागू होणारच ना? भगवंत आता देहाभिमानापोटी माणसाला कित्येक दु:खे कशी भोगायला लागतात ते सांगत आहेत. ते म्हणाले, सर्वप्रथम देहाभिमान अद्वैताची वाढ करतो. त्यामुळे मनुष्य स्वत:ला देवापेक्षा श्रेष्ठ समजू लागतो. त्यातूनच त्याला जगातल्या वस्तूबद्दल आवडनिवड निर्माण होते. त्यातून नश्वर असलेल्या इष्ट वस्तूचा नाश झाला की, त्याला देहाच्या अहंतेमुळे दु:ख होते. त्याला सगळेजण शोक असं म्हणतात. तसंच नाश पावणाऱ्या विषयांची प्राप्ती झाली की, त्याला आनंद होतो. त्याला हर्ष म्हणतात. आपल्याला मिळालेले विषय आपल्याला सोडून तर जाणार नाहीत ना, ह्या विचाराने त्याचे चित्त कासावीस होते. त्याला भय असे म्हणतात. ज्या कुणामुळे त्याच्या विषयसेवनामध्ये अडथळा निर्माण होतो त्या व्यक्तीचा त्याला राग येतो. ह्याला क्रोध असे म्हणतात. एक एक पैसा जमवून मनुष्य पैसे साठवतो. ह्याला लोभ असे म्हणतात. असे करत करत एक दिवस त्याचे आयुष्य संपून जाते. कर्माकर्म, हिताहित, इष्टानिष्ट कशाकशाची पर्वा न करता विवेकशून्यपणे आयुष्य जो घालवतो त्याला मोह असे म्हणतात. जो नित्य विषयसेवन करत असतो. त्याच्या मनात विषयसेवनाची इच्छा आणखीन आणखीन वाढतच जाते. त्यामुळे त्याला अखंड विषयांचेच ध्यान लागलेले असते. त्यालाच स्पृहा असे म्हणतात.
असे हे नाना गुण माणसाच्या ठिकाणी देहाभिमानामुळे येऊन चिकटतात. माणसाच्या जन्ममरणाला कारणीभूत होणाऱ्या ह्या गुणांचा आत्म्याशी काही संबंध नसतो. जेव्हा मनुष्य जागृती आणि स्वप्नावस्थेत असतो तेव्हा त्याला देहाभिमानामुळे हे गुण जाणवत असतात. तो झोपलेला असला की हे गुण त्याला जाणवत नाहीत.
क्रमश:








