अध्याय पाचवा
बाप्पा म्हणाले, कर्माचा त्याग करणं म्हणजे संन्यास ही चुकीची धारणा आहे. त्यामागे शारीरिक कष्ट टाळण्याचा विचार असतो. ह्या विचारामुळे मनुष्य आळशी होतो. त्यामुळे तमोगुण वाढीस लागून शेवटी त्याची अधोगती होते. म्हणून वाट्याला आलेली कर्मे निरपेक्षतेनं करून फळाची अपेक्षा न करणारा खरा संन्यासी होतो. म्हणून आपण कर्मयोग आचरावा असे ज्याला वाटू लागते म्हणून कर्मयोगी हा संन्यासी व्यक्तीपेक्षा प्रशंसनीय आहे. कर्मयोगात विशेष प्रगती करण्यासाठी शमदम उपयोगी पडतात ह्या अर्थाचा योगप्राप्त्यै महाबाहो हेतुऽ कर्मैव मे मतम् । सिद्धियोगस्य संसिद्ध्यै हेतू शमदमौ मतौ ।। 2।। श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार जो वाट्याला आलेलं कर्म निरपेक्षतेने करतो त्यालाच योगप्राप्ती होते. कर्मयोगी निरपेक्षतेनं कर्मे करत असल्याने मी अमुक कर्म केलं की, मला तमुक फळ मिळेल त्यामुळे मला अमुक प्रकारचं सुख मिळेल, मग मी ते आणखीन मिळवायचा प्रयत्न करीन असे विचार त्याच्या मनात येत नाहीत. अपेक्षित सुख मिळाले नाही म्हणून दु:खही वाटत नाही. आपल्याला योगप्राप्ती व्हावी असे ज्याला वाटू लागेल त्याच्या स्वभावाची प्रशंसा का करायची हे बाप्पा आपल्याला समजाऊन सांगत आहेत. बदलणं एव्हढं सोपं नसतं पण तो बदलायचा प्रयत्न करणे म्हणजे अभ्यास. तरीही पुन:पुन्हा मूळ स्वभाव उफाळून येतो. त्यामुळे झालेली चूक लक्षात घेऊन तशा पद्धतीची चूक पुन्हा न होऊ देणे हीच तपश्चर्या होय. असा अभ्यास करत करत तपश्चर्या चालू ठेवावी. स्वभावात संपूर्ण निरपेक्षता आली पाहिजे. निरपेक्षतेनं कर्म करून पाप पुण्याच्या कटकटीतून मनुष्य मुक्त होतो. कटकट म्हणायचं कारण म्हणजे या दोन्हीमुळे पुनर्जन्म मिळतो. आपलं ध्येय तर आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होण्याचा योग साध्य करायचं आहे. त्यासाठी योगनिष्ठा म्हणजे कर्ममार्गावर निष्ठा ठेवणं आवश्यक आहे. निष्ठा म्हणजे अमुक मार्गावरून गेलं की, मुक्कामी पोहोचणारच अशी खात्री असणं. मी सांगतोय त्यावर डोळे मिटून विश्वास ठेव असं घरातली वडीलधारी मंडळी आपल्याला सांगतात आणि त्याबरहुकूम वागल्यावर आपलं भलंच होईल ही खात्री बाळगून आपण पुढे जातो व आपल्याला त्यांच्या सांगण्याचा प्रत्यय येतो. इथं बाप्पा सर्व समाजाला वडीलधाऱ्याच्या भूमिकेतून सांगत आहेत की, कर्मयोगावर निष्ठा ठेवा. पुढं सांगत आहेत, शम आणि दम हे दोन्ही यासाठी आवश्यक आहेत यापैकी शम म्हणजे सहनशीलता कुणी काही वेगळं करतंय म्हंटलं की लोकं लगेच उलटसुलट बोलायला तयारच असतात पण बाप्पानी सांगितलंय म्हंटल्यावर ते बरोबरच असणार असं गृहीत धरून इतरांच्या शेऱ्या-ताशेऱ्यामुळे आपलं मन विचलित करून न घेता कर्मयोगाचं आचरण चालू ठेवणे. तसेच चुकून कधी करत असलेल्या कर्मातून काही फळाची अपेक्षा निर्माण झाली तर ती झटकून टाकणे. या दोन्ही गोष्टी करणे म्हणजे शम होय आणि यासाठी आहे त्यात समाधानी राहणे म्हणजे दम म्हणता येईल. निरपेक्षतेनं कर्म करण्यासाठी शम आणि दम हे दोन्हीही आवश्यक आहेत.
प्रपंच, प्रारब्ध आणि उपाधी या तीन गोष्टींमुळे मनुष्य त्रासून जातो कारण मनात उत्पन्न झालेल्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणं हे माणसाच्या हातात असलं तरी त्या पूर्ण होणं न होणं हे दैवाच्या हातात असतं. त्यामुळे श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात की, या तीन गोष्टींमुळे जो त्रासून जात नाही तो कायम समाधीत असतो आणि ही समाधी साधण्यासाठी शम आणि दम कायम आवश्यक आहेत. ह्या शम आणि दमाच्या सहाय्याने मनुष्य उत्तम योगाची प्राप्ती करून घेऊ शकतो. शम आणि दमाचा उल्लेख असलेला माउलींचा समाधि साधन संजीवन नाम ..शांति दया सम सर्वांभूती हा अभंग सर्वश्रुत आहे.
क्रमश:








