प्रतिनिधी/ बेळगाव
लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोक्सो न्यायालयाने 20 वर्षांचा कठोर कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. शंकर शिवाप्पा माळगी (रा. बेल्लद बागेवाडी, ता. हुक्केरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
शंकर हा अल्पवयीन मुलीला तुझ्याशी लग्न करतो, असे सांगत होता. त्यातूनच त्याने 1 मे 2018 रोजी मुलीचे अपहरण करून तिला महाराष्ट्रातील सावळजा गावाला नेले. त्याठिकाणी एका खोलीत ठेवून तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे याप्रकरणी हुक्केरी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालिन तपास अधिकारी पी. आर. गंगेनहळ्ळी यांनी तपास करून पोक्सो न्यायालयात दोषारोप दाखल केला. त्याठिकाणी 14 साक्षी, 47 कागदोपत्री पुरावे, 6 मुद्देमाल तपासण्यात आले. आरोप सिद्ध झाल्याने न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी आरोपी शंकरला 20 वर्षांचा कठोर कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच जिल्हा कायदा प्राधिकरणाकडून 1 लाखांची मदत देण्याचाही आदेश बजावला. सरकारतर्फे अॅड. एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.









