महाबळेश्वर :
बाजारपेठेत पर्यटक मुलीचे फोटो काढल्याप्रकरणी तौफिक इस्तियाक अहमद (वय ४० रा नयापुरा ता. मालेगाव जिल्हा-नाशिक) याला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध महाबळेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता ७४, ७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून रविवारी न्यायालयात हजार केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. महाबळेश्वरमध्ये अशी कृत्य करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांची भेट घेऊन केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुणे येथून महाबळेश्वर पर्यटनासाठी कुटुंबासमवेत आलेली मुलगी ही बाजारपेठेत खरेदी करत असताना या मुलीचे मालेगाव येथून पर्यटनास आलेल्या एकाने आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढले आपले फोटो काढत असल्याचे मुलीच्या निदर्शनास येताच रडत या मुलीने याबाबतची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली.
या घटनेची माहिती महाबळेश्वर पोलिसांना कुटुंबीयांनी दिली या व्यक्तींसह त्याच्या मित्रांना बाजारपेठेतून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांनी मुलीसह तिच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली आपण तक्रार दिल्यास योग्य ती कारवाई आम्हाला करता येईल असे सांगितले. मात्र हे कुटुंबीय तक्रार देण्यासाठी तयार होत नव्हते मुलीच्या कुटुंबीयांनी “आम्हाला तक्रारच द्यायची नाही मात्र मोबाईलमध्ये काढलेले ते फोटो डिलिट करावे’ अशी विनंती पोलिसांना केली व पर्यटक कुटुंब आपल्या हॉटेल वर निघून गेले.
महाबळेश्वर बाजारपेठेत घडलेल्या प्रकाराची माहिती समजताच माजी नगरसेवक संजय पिसाळ, व्यापारी सचिन वागदरे, विजय नायडू, महेश गुजर, राहुल पिसाळ, विनोद गुजर, सचिन गुजर आदींसह नागरिकांनी पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांनी भेट घेत पोलिसांनी गुन्हा नोंदवून कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणाची माहिती समजताच माजी नगरसेवक संजय पिसाळ व सहकार्यांसह पर्यटक राहत असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन पर्यटक कुटुंबीयांची भेट घेत महाबळेश्वर पर्यटनस्थळी घडलेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला व संबंधितांवर पोलीस योग्य ती कारवाई करतील असे सांगितले. मात्र पर्यटक कुटुंबीय तक्रार देण्यास पुन्हा नकार दिला.
महाबळेश्वर पोलिसांनी तौफिक इस्तियाक अहमद (वय ४०) रा. मालेगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा मोबाईल देखील ताब्यात घेतला आहे.
रविवारी संबंधिताला न्यायालयात हजार केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास पो निरिक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रुपाली काळे करत आहेत.








