मुंबई /प्रतिनिधी
लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईसह राज्यात लगबग असतानाच मुंबईत 34 वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्य माथेफिरूला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या माथेफिरूला आता पुढील चौकशीसाठी मुंबईला आणले जात आहे.नोएडा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव अश्विन कुमार सुप्रा (50) आहे. तो मुळचा बिहारचा असून मागच्या पाच वर्षांपासून नोएडात राहत आहे. धमकी देण्यासाठी आरोपीने वापरलेला फोन आणि सीम कार्ड जप्त करण्यात आले आहे. मुंबई पोलीस आता या प्रकरणाची पुढील चौकशी करतील.
आरोपीला नोएडातील सेक्टर 113 मधून ताब्यात घेण्यात आले. आरोपीने पाठविलेल्या संदेशात म्हटले होते की, तब्बल 34 गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब लावण्यात आले आहेत आणि स्फोटानंतर संपूर्ण मुंबई हादरून जाईल. या संदेशामध्ये ‘लश्कर-ए-जिहादी’ या संघटनेचे नावही घेतले गेले असून 14 पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले आहेत. 400 किलो आरडीएक्सच्या स्फोटामुळे तब्बल एक कोटी लोकांचा बळी जाईल, असेही या संदेशात म्हटले होते. या इश्रायानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने संबंधित यंत्रणेला माहिती दिली. तसेच सर्व पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते.
एफआयआरमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार अश्विनने त्याचा मित्र फिरोजला अडकविण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांना बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती. 2023 मध्ये पाटण्याच्या फुलवारी शरीफमध्ये फिरोजने दाखल केलेल्या गुह्यानंतर अश्विनला तीन महिने कारावास भोगावा लागला होता. याचा सूड उगविण्यासाठी अश्विनने फिरोजच्या नावाने मुंबई वाहतूक पोलिसांच्या क्रमांकावर धमकीचा संदेश पाठवला, अशी माहिती समोर येत आहे.









