रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना अनेक धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी तेलंगणामधून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. गणेश रमेश वनपर्धी असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी शनिवारी त्याला अटक करून न्यायालयाने ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याच्या धमकीचे मेल आले होते. ज्यामध्ये 400 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबानींना धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वत:ची ओळख शादाब खान अशी दिली आहे. यापूर्वी अंबानी यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली होती, ज्यामध्ये 200 कोटी रुपये न दिल्यास त्यांना गोळ्या घालण्यात येईल, असे म्हटले होते.प्रत्येक वेळी नवीन ईमेल पाठवून आरोपींनी खंडणीची रक्कम 200 कोटींवरून 400 कोटींपर्यंत वाढवली. मुंबई पोलिसांनी सांगितले की, अशा प्रकारचा पहिला धमकीचा मेल 28 ऑक्टोबरला पाठवला गेला असेल.
ईमेल मिळाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षाप्रभारींच्या तक्रारीच्या आधारे, मुंबईच्या गामदेवी पोलिसांनी कलम 387 (पैसे उकळण्यासाठी एखाद्या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देणे) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









