आरोपीविरुद्ध यापूर्वीच 26 गुन्हे : सध्या जामिनावर मुक्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस खासदार आर. सुधा यांच्या गळ्यातील 32 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून घेणाऱ्या आरोपीला दिल्ली पोलिसांनी बुधवारी अटक केली. आरोपीचे नाव 24 वर्षीय सोहन रावत असे आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याची चेन आणि दुचाकी जप्त केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवल्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. रावत यांच्यावर यापूर्वीच 26 गुन्हेगारी गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी बहुतेक गुन्हे चोरी आणि स्नॅचिंगशी संबंधित आहेत. एप्रिलमध्ये कार चोरीच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. 27 जून रोजी तो जामिनावर बाहेर आला होता.
सोमवार, 4 ऑगस्ट रोजी तामिळनाडू काँग्रेस खासदार आर. सुधा दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरातील तामिळनाडू भवनाजवळ मॉर्निंग वॉक करत असताना एका दुचाकीस्वार चोरट्याने त्यांच्या गळ्यातील चेन हिसकावून पळ काढला होता. यादरम्यान खासदार सुधा यांच्या मानेला दुखापत झाली होती. सुधा या तामिळनाडूतील मयिलादुथुराई येथील काँग्रेस खासदार आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी सध्या त्या दिल्लीत आहेत. चाणक्यपुरीमध्ये ज्याठिकाणी त्यांची साखळी हिसकावून घेण्यात आली तो भाग दिल्लीतील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक मानला जातो. येथे अनेक दूतावास आणि राज्य सरकारांचे अधिकृत निवासस्थान आहेत. सुरक्षित ठिकाण असूनही महिलेची सोनसाखळी चोरण्याचा प्रकार घडल्यानंतर त्यांनी याप्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नांची सरबत्ती केली होती. तसेच या मुद्यावर संसदेतही आवाज उठवला होता.









