5 राज्यांच्या निकालाची पार्श्वभूमी : 6 डिसेंबरला बैठक
वृत्तसंस्था/ कोलकाता
अलिकडेच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत तीन राज्यांमध्ये भाजपने स्वबळावर बहुमत मिळविले आहे. भाजपचा हा विजय विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’साठी धोक्याची घंटा आहे. अशा स्थितीत विरोधी पक्षांच्या आघाडीची बुधवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. परंतु या बैठकीपूर्वी विरोधी पक्षांच्या आघाडीला मोठा झटका बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या बैठकीत सामील होणार नाहीत.
‘इंडिया’च्या बैठकीसंबंधी मला कुठलीच माहिती नाही. तसेच या बैठकीसंबंधी मला कुणीच काही सांगितलेले नाही तसेच कॉल करून कळविलेले नाही. उत्तर बंगालमध्ये माझा 6-7 दिवसांचा कार्यक्रम आहे. अशास्थितीत ऐनवेळी बैठकीसाठी बोलाविण्यात आल्यास मी माझ्या कार्यक्रमांचे नियोजन बदलू शकत नसल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
यापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी 6 डिसेंबर रोजी नवी दिल्लीत ‘इंडिया’ची बैठक काँग्रेसने बोलाविली असल्याची माहिती नसल्याचा दावा केला होता. अशा स्थितीत तृणमूल काँग्रेस एकप्रकारे इंडिया आघाडीपासून अंतर राखत असल्याचे मानले जात आहे, किंवा या विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व करण्याची ममता बॅनर्जी यांची महत्त्वाकांक्षा असू शकते.
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप तसेच पंतप्रधान मोदींचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेस, द्रमुक, राजद, संजद, आप, सप, द्रमुकसमवेत 26 पक्ष एकत्र आले आहेत. या विरोधी पक्षांच्या आघाडीला ‘इंडिया’ नाव देण्यात आले आहे. या आघाडीची पहिली बैठक पाटण्यात तर दुसरी बैठक बेंगळूर तर तिसरी बैठक मुंबईत पार पडली होती. 5 राज्यांपैकी 4 राज्यांमध्ये पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आता विरोधी पक्षांचे ऐक्य टिकविण्याच्या दृष्टीने 6 डिसेंबर रोजी बैठक बोलाविली आहे. काँग्रेस थेट लढतीत भाजपला पराभूत करण्यास सक्षम नसल्याचा सूर अनेक राजकीय पक्षांमधून उमटला आहे.









