तृणमूल खासदार आझाद यांचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडी’मध्ये नेतृत्वावरून सुरू असलेले वाक्युद्ध सुरूच आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीत आघाडीला मिळालेल्या मोठ्या झटक्यानंतर नेतृत्वाची चढाओढ तीव्र झाली आहे. आता तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा इंडी आघाडीची धुरा ममता बॅनर्जी यांच्या हाती सोपविण्यात यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.
वातावरण स्पष्ट आहे, काही पक्ष खूश नाहीत. हे पक्ष ममता बॅनर्जी यांनी इंडी आघाडीचे नेतृत्व सांभाळावे अशी इच्छा बाळगून आहेत. काँग्रेसचा भाजपविरोधातील स्ट्राइक रेट 10 टक्के आहे. तर ममता बॅनर्जी यांचा स्ट्राइक रेट 70 टक्के आहे. भाजपशी होणाऱ्या थेट लढतीत ममताच सक्षम आहेत. काँग्रेसने ही बाब समजून घेणे गरजेचे असल्याचे तृणमूल काँग्रेसचे खासदार कीर्ति आझाद यांनी म्हटले आहे.
इंडी आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी यांनी करावे असे सर्वच पक्ष म्हणत असताना काँग्रेसला अडचण काय आहे? सुंभ जळाला तरी पीळ गेला नसल्याचे वाटते. काँग्रेस पक्ष सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करू शकलेला नाही. काँग्रेसने जनतेचा अपेक्षाभंग केला असल्याचे वक्तव्य आझाद यांनी केले आहे.
ममता बॅनर्जी यांची लोकप्रियता लोक ओळखून आहेत. उद्धव ठाकरे गट असो किंवा समाजवादी पक्ष किंवा अन्य घटक पक्ष सर्व ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाची मागणी करत आहेत. विशेषकरून आघाडीतील सर्वात वरिष्ठ नेते शरद पवार यांनीही हा विषय उपस्थित केला आहे. या आघाडीला यश मिळवून देण्याची क्षमता ममता बॅनर्जी यांच्याकडे आहे. पश्चिम बंगालमध्ये आमच्या पक्षाची मतांची हिस्सेदारी वाढली असल्याचा दावा आझाद यांनी केला.
राज्याचे यशस्वी नेतृत्व
इंडी आघाडीतील सर्व घटक पक्ष बदल इच्छित आहेत. या पक्षांना एक सक्षम नेतृत्व हवे आहे. बदलासाठी संबंधितांची कामगिरी जाणून घेतली जावी. आमच्या नेत्या मुख्यमंत्री असून त्या नेतृत्व करण्याची संधी मागत आहेत असे आझाद यांनी म्हटले आहे. इंडी आघाडी देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी स्थापन झाली आहे. आगामी काळात लढाई तीव्र होणार आहे. ममता बॅनर्जी या अत्यंत प्रभावी नेत्या आहेत याबद्दल दुमत नाही. ममता बॅनर्जी या सर्वांना सोबत घेत वाटचाल करतात. भाजप विरोधात त्यांनी प्रभावीपणे लढा दिला आहे. नेतृत्व कुणी करावे याचा निर्णय वरिष्ठ नेते मिळून घेतील असे उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.









