वृत्तसंस्था / कोलकाता
प्रयागराज येथील महाकुंभ आता मृत्यूकुंभात रुपांतरित झाला आहे, असे वादग्रस्त विधान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका केली. महाकुंभाचे योग्य व्यवस्थापन करण्यात ते अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे चेंगराचेंगरीत भाविकांचा मृत्यू झाला. गर्दीच्या व्यवस्थापनाही त्यांचे प्रशासन अपुरे पडले आहे, असेही प्रतिपादन ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी येथे केले आहे.
भारतीय जनता पक्ष जनतेत फूट पाडण्यासाठी धर्माचा उपयोग करीत आहे. कुंभमेळ्याचे योग्य प्रकारे आयोजन करण्यात या पक्षाच्या सरकारला अपयश आले आहे. मला महाकुंभासंदर्भात आदर आहे. मी पवित्र गंगामातेचाही आदर करते. पण या महाकुंभात केवळ गोंधळ दिसून येत आहे. या महाकुंभात केवळ श्रीमंतांची सोय केली जात आहे. त्यांना एक लाख रुपयांना तंबू दिला जात आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तींना संगमात स्नान करण्याची संधी आधी दिली जात आहे. मात्र, गरीबांची अवस्था दयनीय आहे. त्यांच्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही, अशी टीका त्यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतरच्या भाषणात केली आहे.
चेंगराचेंगरी होणे शक्य
अशा मोठ्या मेळ्यांमध्ये किंवा महोत्सवांमध्ये चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असते, असेही विधान त्यांनी केले. मात्र, आधीपासून तयारी करावयास हवी होती. पश्चिम बंगालमध्ये मृतदेह पाठविले जात आहेत. या मृतदेहांची उत्तरीय तपासणीही केली गेलेली नाही. बुडून जीव गमावलेल्यांचा किंवा चेंगराचेंगरीत प्राण गमाविलेल्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, अशी सारवासारवी उत्तर प्रदेश सरकारकडून केली जाईल, असाही आरोप त्यांनी भाषणात केला.
30 जणांचा मृत्यू
29 जानेवारीला महाकुंभमेळ्यात मोठी चेंगराचेंगरी झाली होती. गंगा, यमुना आणि गुप्त असणारी सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावर भाविकांची पवित्र स्नानासाठी गर्दी झाली होती. त्यावेळी जनसंख्या नियंत्रणाबाहेर गेल्याने मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरी झाली. या घटनेत किमान 30 जणांचा मृत्यू झाला. 100 लोक जखमी झाले. मात्र, विरोधी पक्षांनी मृत्यूंची संख्या अधिक असल्याचा आरोप केला होता. तथापि, प्रशासनाकडून तो फेटाळण्यात आला होता.
दिल्ली स्थानकावरही चेंगराचेंगरी
रविवारी याच महाकुंभमेळ्याच्या संदर्भात दिल्ली रेल्वे स्थानकावरही चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेत महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या 18 भाविकांनी प्राण गमाविले. फूबब्रिजवर ही चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून ही घटना घातपातही असू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जाते.
प्रचंड प्रतिसाद
प्रयागराज येथील यावेळच्या महाकुंभमेळ्याला देशवासियांचा अपेक्षेपेक्षाही प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत 53 कोटी भाविकांनी यात भाग घेऊन त्रिवेणी संगम स्थानी पवित्र स्नान केले आहे. 26 फेब्रुवारीपर्यंत हा सोहळा चालणार असून साठ कोटींपेक्षा अधिक भाविक ही पवित्र पर्वणी साधतील, अशी शक्यता आहे. या मेळ्याचा कालावधी वाढवावा अशी मागणी आता विरोधी पक्षांकडूनही केली जात आहे. आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी पवित्र स्नान केले असून या महोत्सवाचा कालावधी वाढविला जातो का, याकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे. अद्याप, अनेक भाविक पवित्र स्नानाच्या प्रतीक्षेत आहेत. पंधरा किलोमीटरहून अधिक लांबीच्या रांगा आजही दिसून येत आहेत. संगमस्थानावर प्रतिदिन एक कोटीपेक्षा अधिक भाविक आल्याची नोंद आहे. संगम परिसरात हजारो एकर भूमीवर भाविकांच्या वास्तव्याची व्यवस्था उत्तर प्रदेश सरकारकडून करण्यात आली आहे.









