अपसंख्याकांची आपली मतपेढी सुरक्षित ठेवण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देशाच्या सुरक्षेशी घातक तडजोड करीत आहेत, असा गंभीर आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. आपल्या पक्षाची मते वाढावीत म्हणून त्यांनी बांगलादेशातून घुसखोरांना भारतात येऊ दिले आहे. यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांचा लोकसंख्या समतोल बिघडला आहे. राजकीय नेत्यांनी देशाच्या सुरक्षेशी असा खेळ करणे हानीकार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
घुसखोर हे ममता बॅनर्जी यांचे निष्ठावंत मतदार आहेत. राज्यातील काही मतदारसंघांमध्ये त्यांच्या मतांवरच तृणमूल काँग्रेसचे उमेदवार निवडून येतात. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे भारताच्या खऱ्या नागरीकांची कोणतीही हानी होणार नाही, हे माहीत असूनही त्या या कायद्याला विरोध करतात. याचे कारण त्यांना अल्पसंख्याक समुदायाच्या घुसखोरांचे लांगूलचालन करायचे आहे. त्यामुळे नागरीकांनी सावधानपणे मतदान करावे, अशी सूचना त्यांनी केली.
साधूंविरोधात संधीसाधू विधान
ममता बॅनर्जी यांनी रामकृष्ण मठ आणि भारत सेवाश्रम संघ अशा समाजसेवी आणि देशभक्त संस्थांच्या विरोधात विधाने केली आहेत. या विधानांमधून त्यांची मानसिकता उघडी पडली आहे. या धार्मिक सेवाभावी संस्थांनी ममता
बॅनर्जी यांच्या ‘मतपेढी’समोर झुकावे आणि तिची सेवा करावी, असा त्यांचा हेतू आहे. त्यामुळे त्या अशा संस्थांवर दबाव आणण्याच्या प्रयत्नात आहेत, असा आरोप त्यांनी केला.
राज्यात लोकशाहीला धोका
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सत्ताकाळात लोकशाहीला गंभीर धोका निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. दलित आणि आदीवासी महिलांवर अत्याचार होत आहेत आणि त्यांची तुटपुंजी संपत्तीही लुटली जात आहे. त्यामुळे लोकशाही वाचविण्याची खरी आवश्यकता याच राज्यात आहे, याची नोंद मतदार घेतीलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विरोधकांचा पराभव निश्चित
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पाच टप्पे झाले आहेत. या पाच टप्प्यांमध्येच विरोधकांची आघाडी भुईसपाट झाली आहे. साऱ्या देशभर या आघाडीला माघार घ्यावी लागत आहे. भारतीय जनता पक्षाला मतदारांचे मोठे समर्थन मिळत आहे. यावेळी पश्चिम बंगालमध्येही भारतीय जनता पक्ष 30 हून अधिक जागा जिंकेल. तर तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव होईल. त्यानंतर तृणमूल काँग्रेस पक्षात अनागोंदी माजून पक्ष खिळखिळा होईल, असे भाकित त्यांनी केले.









